दापोडीतील समांतर पुलाला मार्चचा मुहूर्त

पिंपरी – दापोडी येथे असलेल्या हॅरिस पुलाला समांतर असणाऱ्या दुसऱ्या बाजूच्या पुलाचे काम वेगाने सुरु आहे. दुसऱ्या बाजूला खांब उभारणीचे काम सुरु असून मार्च महिन्यात पूल वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्‍यता आहे. या पुलामुळे पुणे व पिंपरीकडे जाणाऱ्या वाहन चालकांना वाहतूक कोंडीमुक्त प्रवास करता येणार आहे.

पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरातून ये-जा करणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसें-दिवस वाढत आहे. या पुलावर सकाळ व सायंकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती. मात्र, येत्या चार महिन्यात दुसऱ्या बाजूचा पुल वाहतुकीसाठी खुला केल्यानंतर वाहतूक कोंडी कमी होणार आहे. दुसऱ्या बाजूला म्हणजेच बोपोडी येथील झोपडपट्टीचे जुलै महिन्यात स्थलांतर झाल्यानंतर या पुलाचे शेवटच्या टप्यातील काम हाती घेण्यात आले आहे. सद्यस्थितीत पोहोच रस्त्यासाठी मुरुम व खडीचा भराव टाकण्याचे काम सुरु करण्यात आले.

पावसाळ्यात पुलाचे काम काही दिवस बंद असल्याने कामास विलंब झाला होता. मात्र, सध्या काम वेगाने सुरु आहे. दुसऱ्या बाजूला असणाऱ्या झोपडपट्ट्या स्थलांतरीत झाल्यानंतर प्रथम त्याजागी पुलासाठी संरक्षण भिंत बांधण्याचे काम हाती घेण्यात आले. सध्या मुळा नदीकाठच्या रस्त्यालगत पुलाचा शेवटचा खांब बांधण्यात येत आहे. खांबाचे बहुतांशी काम झाले असून खांबापर्यतचा स्लॅब टाकण्याचे काम हाती घेतले आहे. फेब्रुवारी 2019 पर्यत ही कामे केली जाणार आहेत. पोहोच रस्त्यावरील काम पूर्ण झाल्यानंतर संरक्षण कठडे, पदपथ, विद्युतची कामे, लोखंडी ग्रील, डांबरीकरण, रंगरंगोटीचे काम सुरु होणार आहे.

या मार्गावर पूल बांधण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. मात्र, पिंपरी कडून पुण्याच्या दिशेने जाणारी पुलाची एक बाजू जुलै 2018 मध्ये पूर्ण झाल्यानंतर काही प्रमाणात वाहतूक कोंडी कमी झाली. या पुलाला नवीन समांतर पूल बांधण्याचे काम मे 2016 साली हाती घेण्यात आले होते. या पुलासाठी दोन वर्षाची मूदत देण्यात आली होती. बोपोडीतील झोपडपट्टी वेळेत निष्कासित न केल्याने पुण्याकडून पिंपरीकडे जाणाऱ्या पुलास मुदतवाढ देऊन 2019 करण्यात आली. हॅरीस पूलाच्या दुसऱ्या समांतर पुलाचे काम झाल्यानंतर ये-जा करण्यासाठी प्रत्येकी चार लेन उपलब्ध होणार असल्याने वाहतूक सुरळीत होणार आहे. तसेच, या प्रकल्पाचा खर्च पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका पन्नास-पन्नास टक्के देणार आहे.

येत्या चार महिन्यात पूलाचे काम पूर्ण करुन वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. हॅरीस पुलाची समांतर दुसऱ्या बाजूचे काम 80 टक्‍के पूर्ण झाले आहे. या पुलाची दुसरी बाजू सुरु झाल्यानंतर वाहतूक कोंडी सुटण्यास निश्‍चितपणे मदत होणार आहे.
– विजय भोजणे, उपअभियंता व प्रवक्‍ते, बीआरटी विभाग, महापलिका.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)