पिंपरी – भाजपचे पश्चिम महाराष्ट्राचे संघटनमंत्री रवी अनासपुरे यांच्या शिष्टाईला यश आले असून भाजपच्या काही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी सुरू केलेले उपोषण अखेर गुरुवारी रात्री उशिरा मागे घेतले. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या समवेत निष्ठावंतांची लवकरच बैठक आयोजित करण्याचे आश्वासन अनासपुरे यांनी दिले. त्यानंतर हे उपोषण मागे घेतले आहे.
महापालिका प्रभाग समितीच्या स्वीकृत सदस्य निवडीत निष्ठावंतांना डावलण्यात आल्याचा आरोप करीत काही इच्छुकांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. पक्षाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी संध्याकाळी समक्ष जाऊन उपोषणकर्त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांना यश आले नाही. उलट शहराध्यक्षांवर हुकूमशाहीचा आरोप करीत उपोषणकर्त्यांनी शहराध्यक्ष हटविण्याची मागणी केली.
परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून रात्री उशिरा संघटनमंत्री अनासपुरे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी फोनवर संपर्क साधून दिला तसेच उपोषणकर्ते व दानवे यांची बैठक लवकरच आयोजित करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर ऊसाचा रस घेत उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा