दादा जे पी वासवानी यांचे निधन, आज अंत्यसंस्कार

पुणे – जगप्रसिध्द साधू वासवानी मिशनचे प्रमुख तथा अध्यात्मिक गुुरु दादा वासवानी यांचे गुरुवारी सकाळी 9 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. ते 99 वर्षांचे होते. वासवानी मिशनमध्ये सकाळी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. गुरुवारी त्यांच पार्थिव अंतिम दर्शनासाठी वासवानी मिशनमध्ये ठेवण्यात आले होते. दरम्यान, आज दुपारी दोन वाजता साधू वासवानी मिशन येथून रथयात्रा काढून सायंकाळी 5 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
दादा वासवानी यांचे पुर्ण नाव जशन पहलराज वासवानी असे होते. सिंधी समाजाचे धार्मिक गुरु अशी त्यांची ओळख होती. त्यांनी त्यांच्या आयुष्यात शाकाहाराचा प्रचार केला. दादा वासवानी यांच्यावर गेल्या काही दिवासांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारानंतर त्यांना घरी आणले होते. मात्र गुरुवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

दादा वासवानी यांचा जन्म पाकिस्तानात सिंध प्रांतातील हैद्राबाद येथे 2 ऑगस्ट 1918 रोजी झाला. त्यांच्या आईचे नाव कृष्णादेवी आणि वडिलांचे नाव पेहेलाजराय होते. पेहेलाजराय हे पेशाने हैद्राबाद ट्रेनिंग कॉलेजमध्ये शिक्षक होते. दादा वासवानी यांचे प्राथमिक शिक्षण हैद्राबाद (पकिस्तान) येथे टी सी प्रायमरी स्कूल मध्ये झाले. लहानपणापासून अत्यंत बुद्धिवान असलेल्या दादांनी वयाच्या 17 वर्षी एमएस्सीची पदवी मिळविली होती. इंग्रजी आणि सिंधी भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. साधू वासवानी यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी समाजसेवेचे व्रत अंगीकारले. अगदी सोप्या भाषेत अनुयांयाना विचाराचे धडे देण्यात त्यांचा हातखंडा होता. साधू वासवानी यांच्या निधनानंतर साधू वासवानी मिशनची सूत्रे दादा जे. पी. वासवानी यांच्याकडे होती. त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, रुग्णालय क्षेत्रात साधू वासवानी मिशनच्यावतीने भरीव कामगिरी केली आहे. देशभरात मिशनच्या शाळा असून आंतरराष्ट्रीय स्तरावर लंडनमध्ये लीटल लॅम्प नर्सरीची उभारणी करण्यात आली आहे.

आज अंत्यसंस्कार 
दादा वासवानी यांची रथयात्रा अंत्ययात्रा आज (शुक्रवार दि.13) दुपारी दोन वाजता साधू वासवानी मिशनमधून निघणार आहे. शुक्रवारी दुपारी त्यांचे पार्थिव रथात ठेवून अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. साधू वासवानी चौकातून सुरू झालेली अंत्ययात्रा कौन्सील हॉलपासून उजवीकडे वळून पुना क्‍लब, हॉटेल सागर प्लाझा, दोराबजी येथून उजवीकडे वळून रहीम पेट्रोल पंप, क्वॉटर गेट, पद्मजी गेट पोलीस चौकी, निशांत टॉकीज, अगरवाल कॉलनी, बाबाजान चौक, महात्मा गांधी रोड, अरोरा टॉवरकडून दोराबजी, नेहरू मेमोरियल हॉल येथून साधू वासवानी कुंज, शांती कुज येथून पुन्हा दादाजी समाधीजवळ ही अंत्ययात्रा संपेल. त्याठिकाणी त्यांच्या पार्थिवावर सिंधी समाजाच्या पध्दतीने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. अंत्यसंस्काराला भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्यासह अनेक दिग्गजांची उपस्थिती राहणार आहे.

….2 ऑगस्ट रोजी वयाची शंभरी होणार होती 
2 ऑगस्ट 1918 रोजी दादा वासवानी यांचा जन्म झाला. येत्या 2 ऑगस्ट रोजी ते वयाची शंभरी पुर्ण करणार होते. वयाची शंभरी पुर्ण होत असल्याने साधु वासवानी मिशनतर्फे जय्यत तयारी सुरू करण्यात आली होती. मात्र, गुरुवारीच त्यांचे निधन झाल्याने अनुयायांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)