दादा खरं बोलले; पण.. (अग्रलेख)

File Photo

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण होत असताना सत्ताधारी आणि विरोधी पक्ष आपापली बाजू मांडत आहेत. दुसरीकडे महाराष्ट्रातही फडणवीस सरकारला साडेतीन वर्षे पूर्ण झाली आहेत. फडणवीस सरकारमधील दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या पार्श्‍वभूमीवर व्यक्‍त केलेले मत महत्वाचे आहे. “शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे चुकीचे राजकारण करीत आहेत,’ अशी टीका करतानाच दादांनी, “भाजप आणि शिवसेना एकत्र लढले नाहीत, तर राज्यात पुन्हा कॉंग्रेसची सत्ता येईल,’ असा भीतीयुक्‍त अंदाजही व्यक्त केला आहे.

त्याशिवाय राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनीही, “भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवावी, ही प्रत्येक भाजप नेत्याची भावना आहे’, असा दावा केला आहे. “भाजपपासून प्रादेशिक पक्ष दूर जात असल्याचे चित्र आता दिसत असले, तरी ते खरे नाही आणि आगामी काळात हे चित्र बदलण्याची क्षमता आमच्या केंद्रीय नेतृत्वामध्ये आहे’, असा विश्‍वासही मुंडे यांनी व्यक्‍त केला आहे. चंद्रकातदादा आणि पंकजाताई 100 टक्के खरेच बोलले आहेत. पण त्यामुळे शिवसेना घाबरून जाईल किंवा त्यांना पश्‍चाताप होईल आणि शिवसेना लगेचच वळणावर येईल, असे मानणे भाबडेपणाचे ठरणार आहे. कारण पालघऱ लोकसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने फडणवीस आणि ठाकरे यांच्यात जे काही वाकयुध्द सुरु आहे, ते पाहता शिवसेना कोणत्याही प्रकारच्या तडजोडीच्या मन:स्थितीत आहे, असे वाटत नाही.

 

सत्तेत राहूनही विरोधी पक्षाचे काम करण्याबद्दल शिवसेनेवर टीका होत असल्याने आता आगामी निवडणुकीनंतर संपूर्णपणे विरोधीपक्षाची भूमिका वठवण्यातच शिवसेनेला रस आहे. भाजपशी युती तुटल्यास आपण सत्तेवर येऊ शकणार नाही याची कल्पनाही शिवसेनेला आहेच. तरीही स्वबळ आजमावण्यावर शिवसेना ठाम आहे. कारण देशात प्रादेशिक पक्षांचा प्रभाव वाढत असल्याने शिवसेनेलाही त्याच पंगतीत बसायची इच्छा आहे.

 

दुसरीकडे, फडणवीस यांनी ज्या शब्दात आणि आवेशात शिवसेनेला प्रत्त्युत्तर दिले आहे, त्यावरुन स्वत: फडणवीसही शिवसेनेशी जुळवून घेण्याच्या विचारात नाहीत, हे उघड आहे. तरीही चंद्रकांतदादा जे काही बोलले त्यातील सत्य लपत नाही. “शिवसेनेशी युती करणे ही भाजपची अगतिकता आहे’, याची कबुलीही त्यांनी दिली आहे. गेली 30 वर्षं हे दोन पक्ष युती म्हणून लढत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपची सत्ता येण्याची शक्‍यता खूपच कमी असली तरी “शिवसेनेशी युती झाली नाही तर सत्ता जाणार,’ हे अधिक ठामपणे समोर येईल. खरे तर गेली विधानसभा निवडणूकही भाजप आणि शिवसेना यांनी स्वतंत्रपणे लढवली होती. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीही स्वबळावर मैदानात उतरले होते.

चौरंगी लढत झाल्यामुळेच कदाचित भाजपला सर्वात जास्त जागा मिळाल्या आणि राष्ट्रवादीच्या अदृष्य पाठिंब्यावर ते सत्तेवर आले. दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेकडे विरोधी पक्षाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर शिवसेनेला सत्तेत भागीदारी देण्यात आली. तरीही गेल्या तीन वर्षाच्या कालावधीत शिवसेना अद्याप विरोधी पक्षाच्या मानसिकतेतून बाहेर पडलेली नाही. सरकारला जेवढा विरोध कॉंग्रेस आणि राष्टृवादी यांनी करणे अपेक्षित आहे, त्यापेक्षा जास्त विरोध शिवसेनाच करीत आली आहे.

एवढेच नाही, तर उद्धव ठाकरे यांनी गेल्या वर्षीच्या दसरा मेळाव्यात सर्व निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणाही केली आहे; आणि त्या घोषणेचा पुनरुच्चार ते सतत करत आहेत. या पार्श्‍वभूमीवर चंद्रकांतदादा यांच्या वरील विधानांचा विचार करावा लागणार आहे. सध्या जाणीवपूर्वक विरोधीपक्षाच्या भूमिकेत असलेल्या शिवसेनेला सत्तेवर येण्याची आशा आणि अपेक्षा नाही, हे उघड आहे. सत्तेत राहूनही विरोधी पक्षाचे काम करण्याबद्दल शिवसेनेवर टीका होत असल्याने आता आगामी निवडणुकीनंतर संपूर्णपणे विरोधीपक्षाची भूमिका वठवण्यातच शिवसेनेला रस आहे. भाजपशी युती तुटल्यास आपण सत्तेवर येऊ शकणार नाही याची कल्पनाही शिवसेनेला आहेच. तरीही स्वबळ आजमावण्यावर शिवसेना ठाम आहे. कारण देशात प्रादेशिक पक्षांचा प्रभाव वाढत असल्याने शिवसेनेलाही त्याच पंगतीत बसायची इच्छा आहे.

पश्‍चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेकवर्षे प्रभावी असलेल्या कॉंग्रेस आणि कम्युनिस्ट यांना ममता यांनी सत्तेबाहेर घालवले आहे. तीच परिस्थिती तामिळनाडुतील आहे. द्रमुुक आणि अद्रमुक हे प्रादेशिक पक्ष या राज्यात राष्ट्रीय पक्षांना फिरकूही देत नाहीत. कॉंग्रेस आणि भाजप यांना तेथे कायम दुय्यम भुमिका घ्यावी लागते. ओरिसात बिजु जनता दल अनेक वर्ष सत्तेवर आहे. बिहारात राष्ट्रीय जनता दल आणि जदयू जरी राष्ट्रीय पक्ष असले तरी ते प्रादेशिक राजकारणच करीत आहेत. आंध्रमध्येही तेलगू देशम आणि तेलंगण राष्ट्र समिती हे पक्ष संपूर्णपणे प्रादेशिक अस्मितेचे राजकारण करतात.

नव्यानेच सत्तेवर आलेला कुमारस्वामी यांचा जेडीएस हा पक्षही कर्नाटकपुरता मर्यादित आहे. ही सर्व उदाहरणे ठाकरे यांच्या समोर असल्यानेच आता भाजपच्या पाठीमागे फरफटत जाण्यात त्यांना कोणताही रस उरला नाही. देशात कोणाचेही राज्य आले तरी महाराष्ट्रापुरतेच प्रादेशिक अस्मितेचे राजकारण करुन स्वत:चा प्रभाव अधिक वाढवण्यात शिवसेनेला रस आहे. ममता बॅनर्जी यांचा पक्ष अगदी कमी कालावधीत सत्तेवर येऊ शकत असेल, तर गेली 50 वर्षे राजकारणात असलेल्या शिवसेनेने स्वबळावर सत्तेवर येण्याचे स्वप्न बाळगले, तर त्यात चुकीचे काहीच नाही. शिवसेनेची मानसिकता आता त्याच दिशेने जाऊ लागली आहे. त्यामुळे होणाऱ्या परिणामांची त्यांना संपूर्ण कल्पना आहे. साहजिकच आगामी काळात भाजपच्या कोणत्याही नेत्याने शिवसेनेला चुचकारण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही, हे वास्तव आहे. राज्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांची आघाडी झाली तर चंद्रकांतदादा यांनी व्यक्‍त केलेला अंदाज 100 टक्के खरा ठरणार आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)