दातांचे आरोग्यही महत्वाचे (भाग ३)

डॉ. जयदीप महाजन 
रोज सकाळी दात घासल्याशिवाय आपला दिवस खरे तर सुरू होत नाही. मात्र, तरीही दातांच्या आणि हिरड्यांच्या एकूण आरोग्याबाबत आपण अनेक समस्यांचा सामना करत असतो. केवळ भारी टुथपेस्ट वापरणे किंवा दिवसातून दोनदा दात घासणे यांनी या समस्या दूर होणार नाहीत. त्यासाठी दातांच्या समस्या समजून घेणे क्रमप्राप्त ठरते हे नक्की… 
प्लेक म्हणजे काय? 
डेंटल प्लेक हा जीवाणू तसेच अन्नकणांपासून बनलेला मऊ, चिकट आणि रंगहीन थर असतो व तो दातांवर सतत तयार होत असतो. जीवणूंची वस्ती वाढत जाते तसतसे हिरड्यांपर्यंत जंतुसंसर्ग पोहोचून त्यांमधून रक्त येऊ लागते. दर 12-14 तासांनी हा थर ब्रशने काढून न टाकल्यास त्याचे अधिक कठीण थरामध्ये म्हणजे कॅलक्‍युलस ऊर्फ टार्टरमध्ये रूपांतर होते. नंतर मात्र हा थर ब्रशने काढता येत नाही व त्यासाठी दंतवैद्याने स्केलिंग करावे लागते.
हिरडीचे विकार 
जगभराच्या लोकसंख्येपैकी 90 टक्के लोकांना कोणता तरी हिरडीचा विकार जडलेला असतो. तसेच जागतिक लोकसंख्येपैकी एक पंचमांश लोकांना हिरडी संदर्भाच्या पीरियरोन्डिटिस या विकाराने ग्रासलेले आहे.
पीरियरोन्डिटिस विकारात काय काळजी घ्याल? 
पीरियरोन्डिटिस हिरडीचा आजार होऊ नये म्हणून घरबसल्या सुचविला जाणारा उपचार म्हणजे दिवसातून दोन वेळा ब्रशने दातांची सफाई करणे. मात्र, बऱ्याचदा दिवसातून दोन वेळा ब्रश करूनही अपेक्षित गोष्टी घडत नाहीत. ब्रशने दात घासल्यामुळे तोंडामधील 25 टक्के भागाची सफाई केली जाते. मात्र, 75 टक्के भाग हा तसाच सफाईविना राहतो. तसेच बऱ्याचदा ब्रशमुळे दातांची तसेच दातांमधील जागेची पूर्णत: सफाई होत नाही. दातांमधील जागेची सफाई करण्यासाठी डेंटल फ्लॉस तसेच वेगळ्या पद्धतीच्या ब्रशचा उपयोग केला जातो.
ब्रशिंग कसे कराल? 
दररोज ब्रश करूनही दातांचे पूर्ण आरोग्य राखता येत नाही. वास्तविक दात स्वच्छ करण्यासाठी किमान दोन मिनिटांसाठी ब्रश करणे आवश्‍यक असते. मात्र, प्रत्यक्षात बहुतेक लोक 1 मिनिटांपेक्षा कमी वेळेसाठी ब्रशिंग करतात आणि त्यांना आपण दोन मिनिटांसाठी ब्रश केल्याचे वाटत राहते. त्यामुळे सद्यपरिस्थितीत ब्रशिंग आणि फ्लॉसिंग हे दोनच प्रकार दाताचे आरोग्य चांगले राखण्यासाठी उपलब्ध असले तरी ते पूर्णत: पुरे नाहीत.
माऊथवॉश घेणे का हितकारक? 
दंत आरोग्य चांगले राखण्यासाठी माऊथवॉश घेणेही हितकारक ठरते. अशा प्रकारचा वॉश हा जंतू प्रतिकारक असल्यामुळे तो मुखातील जीभ, हिरड्या, दात, दाढा, दातांमधील जागा आदी ठिकाणी पोचतो. तेथील जंतूचा नायनाट करतो.
माऊथवॉश हा तोंडामध्ये जंतूंची निर्मिती होऊ देत नाही. ब्रशिंग आणि हिरड्यांमध्ये अशा प्रकारची जंतूनिर्मिती शक्‍य असते. त्यामुळे ब्रशिंग आणि फ्लॉसिंगबरोबरच दररोज अशा प्रकारचा जंतू प्रतिकारक माऊथवॉश घेणे हितकारक आहे. त्यामुळे तुमच्या तोंडात चांगला सुगंध तर निर्माण होतोच. त्याशिवाय तोंडाचे आरोग्यही चांगले राहते.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)