दागिने खुलवतात सौंदर्य

आजकाल परांपरागत शैलीला अनुसरून तयार करण्यात आलेले दागिने, त्यांच्या काही खास वैशिष्ट्यांमुळे किशोरींना खूपच आवडू लागले आहेत. त्यातील तांब्याचे सेट आणि कडे तर गौरवर्णाच्या किशोरीचं सौंदर्य कितीतरी पटीने वाढवतात. पानांच्या आकाराचे तांब्याचं लॉकेट, तांबे आणि काशांचे लहान लहान तुकडे एकमेकाला जोडून तयार केलेले कडे आणि तांब्याच्या दागिन्यांवर केलेलं नक्षीकाम पाहणाऱ्याचं मन मोहून टाकतं. हे दागिने प्रत्येक रंगाच्या पेहेरावावर शोभून दिसतात. लाईट मेटलमध्ये रंगीबेरंगी खडे, काचा आणि नग जडवून तयार केलेल्या अंगठ्या, कडे, बांगड्या, गळ्यातले हार, क्‍लिप्स, हेअर पिना आणि टॉप्स बाजारात विकत मिळतात. हे दागिने किशोरींच्या सौंदर्यात हमखास वृद्धी करतात. लाकडापासून बनवलेले, आकाराने गोल, लांबट अथवा चपटे असलेले हार, टॉप्स व इतर दागिने अनेक रंगात व अनेक डिझाइन्समध्ये मिळतात.

अंगावरील कपड्याच्या रंगाशी मिळतेजुळते, वेगळ्या-वेगळ्या डिझाइन्सचे लाकडी दागिने खरेदी करणं आजकालच्या किशोरींना खूप आवडतं.

चांदीचे हलके दागिनेही किशोरींच्या अंगावर शोभून दिसतात. चांदीचे तारयुक्त नुपूर (तोरड्या), कंगन, हेअरपिना, झुमके आणि साखळ्या घातलेली किशोरी खूपच सुंदर दिसते. चांदी काळवंडत नसल्यामुळे वारंवार पॉलिश करण्याची कटकट नसते. ग्रामीण भागातील गळ्यातली हांसळी आता शहरी किशोरी फॅशन म्हणून वापरू लागल्या आहेत. चांदी किंवा तत्सम धातूंवर काढलेल्या आकृत्या त्यांचं आकर्षण अनेक पटींनी वाढवतात. हे दागिने अंगावर घालणारी किशोरी, उंच असो वा लठ्ठ, काळी असो वा गोरी; हमखास सुंदर दिसते. सलवार-कुर्त्यावर हे दागिने भलतेच शोभून दिसतात.

चांदी काळी करून दागिने तयार करण्याची पद्धत रूढ होत चालली आहे. या पद्धतीला “काळी चांदी असं नाव आहे. लॉकेट व टॉप्स किंवा झुमके, लहान बांगड्या, चेन्स आणि अंगठ्या विवाहप्रसंगी घातल्यास अतिशय सुंदर वाटतात. साखळ्यांमध्ये थोड्या थोड्या अंतरावर गाठी मारलेल्या असतात.

शिंपले, रंगीबेरंगी खड्याच्या माळा, कडे व टॉप्स आजकाल प्रत्येक कृत्रिम दागिन्यांच्या दुकानात मिळतात. हे दागिने दिसायला अत्यंत सुंदर व सौम्य तर असतातच पण ते दररोज वापरताही येतात. राजस्थानी शैलीचे खडे बसवलेली अंगठी, बांगड्या आणि कर्णफुले हे दागिने किशोरींचे आवडते दागिने आहेत. लाकडी आणि धातूवर लाल-हिरव्या रंगाने जयपूरी मीनाकारी केलेले कानातले झुमके, गोल व अंडाकृती रिंगा आणि लॉकेट आजकाल बरेच प्रचलित आहेत.

अशा दागिन्यात बंगालची सूक्ष्म कारागिरी देखील पाहायला मिळते. वाढदिवस, साखरपुडा व मेजवानीप्रसंगी पेहरावाला अनुसरून हे दागिने घालण्यात किशोरींना एक वेगळाच आनंद मिळतो. किशोरींसाठी आधुनिक व स्वस्त दागिने म्हणजे प्लॅस्टिकचे. अनेक रंग आणि वेगवेगळ्या डिझाइन्समध्ये तयार केलेले हे दागिने पाहिल्यावर ते प्लॅस्टिकचे आहेत यावर सहसा कुणाचा विश्वासच बसत नाही. पेहरावाच्या रंगाशी साम्य असणारे हे नागमोडी आकारात बनवलेले खडे, टॉप्स, लांब- त्रिकोणी काटे, रिंगा, जडाऊ पिना, प्रिंटेड हेअर बॅंड, फुलांच्या हेअर पिना, प्लॅस्टिकचे रंगीबेरंगी रबर बॅंड बाजारात सर्वत्र मिळतात.

अनेक रंगाचे स्कर्ट टॉप, जीन्स टॉप या सारख्या पोषाखांवर हे प्लॅस्टिकचे दागिने घातल्यास कुणाचीही नजर आपल्यावर खिळल्याशिवाय राहणार नाही. लाखेचे कडे फार पूर्वीपासून प्रचलित आहेत. आजदेखील किशोरींच्या हातांची ते शोभा वाढवतात. अनेक रंगात मिळणारे हे कडे सहजासहजी लवकर तुटत नाहीत. तर असे हे विविध दागिने युवतींचे सौंदर्य खुलवतात. कुठल्या ड्रेसवर किंवा कुठल्या साडीवर, कोणत्या वेळी कोणते दागिने चांगले दिसतील याचा विचार करुनच ते घातले पाहिजे. तेवढी कल्पकता आपल्याकडे पाहिजेच तरच आपले सौंदर्य खुलेल.

– सुजाता टिकेकर

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)