दांडीबहाद्दर लिपिकाची खातेनिहाय चौकशी

पिंपरी – महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील महिला लिपिक विनापरवानगी तब्बल दहा महिने झाले गैरहजर राहिल्या आहेत. गैरहजेरीमुळे रुग्णालयीन अत्यावश्‍यक सेवेत आणि प्रशासकीय कामकाजात अडथळा निर्माण झाल्याचा ठपका ठेवत त्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएमएच) लिपीक या गट क दर्जाच्या पदावर परिविक्षाधीन कालावधीमध्ये रुपाली पिराजी तुमकर कार्यरत आहेत. त्यांचेकडे बंधपत्रित वैद्यकीय अधिकारी, मानधनावर रजिस्टर व हाऊसमन, स्टाफनर्स, ब्लड बॅंक टेक्‍निशियन आदी पदांच्या नियुक्‍ती, मुदतवाढीचे कामकाज आणि स्टाफनर्स पदाचे आस्थापनेचे कामकाज, माहिती अधिकार विषयक कामकाज सोपविण्यात आलेले आहे.

-Ads-

लिपीक रुपाली तुमकर या 22 फेब्रुवारी ते 1 डिसेंबर 2017 अखेर 287 दिवस विना अर्ज आणि विनापरवानगी गैरहजर राहिल्या आहेत. याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाने त्यांना कारणे दाखवा नोटीस दिली होती. परंतु, त्यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही.

दरम्यान, लिपिक रुपाली तुमकर यांनी विनापरवाना गैरहजेरीमुळे रुग्णालयीन अत्यावश्‍यक व प्रशासकीय सेवेच्या कामकाजात अडथळा निर्माण झाल्याची बाब वैद्यकीय अधिक्षक यांनी निदर्शनास आणून दिलेली आहे. त्यामुळे नेमून दिलेल्या ठिकाणी विनापरवाना गैरहजर राहून केलेल्या गैरवर्तनामूळे महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम 1979 मधील नियम 3 चा भंग झाला आहे. तसेच महानगरपालिका अधिनियमातील कलम 56 (1) चे तरतुदींच्या अधिन राहून खातेनिहाय चौकशी सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. त्या आदेशाची नोंद त्यांच्या सेवा पुस्तकात नोंद घेण्यात यावी, असेही आदेशात आयुक्‍त हर्डीकर यांनी म्हटले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)