दहिवडी आगाराच्या बस रोखल्या

गोंदवले – दहिवडी आगाराच्या ढिसाळ कारभारामुळे शिंगणापूर मार्गावरील विद्यार्थ्यांचे हाल होत असल्याने संतप्त झालेल्या पालकांनी शिंगणापूर बसस्थानकात करमाळा आगाराची एसटी बस रोखून धरली. अखेर एक तासाने दहिवडी आगारातून विद्यार्थ्यांसाठी बस सोडल्यानंतर सदरची बस सोडण्यात आली.

दिवसेंदिवस दहिवडी आगारचा गलथान कारभार वाढत असून अनेक रूट वरील फेऱ्या अचानक रद्द केल्या जात असल्याने प्रवाशांची व विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. शिंगणापूर, थदाळे येथून वावरहिरे येथे शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. मात्र दुपारनंतर दहिवडी आगारातून नातेपुतेकडे जाणाऱ्या बसेस रद्द होत असल्याने विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे हाल होत आहेत. सायंकाळी सव्वा पाच वाजता सुटणारी विद्यार्थी फेरी वारंवार रद्द होत असल्याने वावरहिरे येथून शिंगणापूर, थदाळेकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना घरी जाण्यास रात्री आठ-नऊ वाजत आहेत. याबाबत शिंगणापूर, थदाळे येथील पालक, शाळा प्रशासन यासह विविध संघटनानी निवेदन देऊनही त्याची दखल घेतली जात नसल्याने दहिवडी आगाराच्या मनमानी कारभाराबाबत संताप व्यक्त होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मंगळवारी दहिवडी आगाराने विद्यार्थ्यांसाठी बस सोडली नाही. तसेच करमाळा आगाराच्या बसमध्ये वावरहिरेहून शिंगणापूरकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना घेतले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी शिंगणापूर बसस्थानकामध्ये सातारा-करमाळा बस अडवून धरली. यावेळी पालकांनी चालक वाहकाना जाब विचारत धारेवर धरले. दहिवडीतून शिंगणापूरसाठी बस सोडल्याशिवाय रोखून धरलेली करमाळा बस सोडणार नाही अशी भूमिका संतप्त झालेल्या पालकांनी घेतली. साधारण एक तास हा गोंधळ सुरू होता.

शिंगणापूर वाहतूक नियंत्रक यांनी दहिवडी आगारप्रमुख यांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर दहिवडी येथून शिंगणापूरसाठी बस सोडण्यात आली. मात्र शिंगणापूर मार्गावरील बसेस रद्द करून त्या अन्य मार्गावर सोडणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी पालक व शाळेच्या वतीने करण्यात येत आहे. तसेच विद्यार्थी बसफेरी नियमित न सोडल्यास तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशार देण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)