पाण्यासाठी नागरिकांची स्मशानभूमीतील हातपंपावर गर्दी
दहिवडी, दि. 14 (प्रतिनिधी)- दहिवडीसह परिसरातील वाडी वस्तीवरील लोकांसाठी दोन खाजगी टॅंकर व एका नगर पंचायतीच्या टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, गत काही दिवसांपासून दोन खाजगी टॅंकर बंद करण्यात आल्याने पाण्याविना नागरिक अक्षरश: हैराण झाले आहेत. दरम्यान, येथील स्मशानभूमीमध्ये असलेल्या हातपंपावर पाण्यासाठी दहिवडी शहरासह वाडीवस्तीवरील नागरिक गर्दी करु लागले आहेत.
माण तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. मात्र या परिस्थितीचे ना लोकप्रतिनिधी, ना अधिकारी वर्गाला सोयीरसुतक आहे. टंचाईमुळे दहिवडी शहरासह वाडीवस्तीवरील नागरिकांना दोन खाजगी टॅंकर व एक नगरपंचायत टॅंकरने पाणी पुरवठा होत होता. मात्र नगरपंचायत मधील राजकीय खेळ्यांमुळे खाजगी दोन टॅंकर बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे एका चार हजार लिटरच्या टॅंकरने पंधरा ते वीस हजार लोकसंख्या असलेल्या शहराला पाणीपुरवठा करावा लागत आहेत. यामुळे दहिवडीवासियांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
पिंगळी तलावात पाणी आणू म्हणणारे देखील या प्रश्नाकडे बघायला तयार नाहीत. स्वत:ची राजकीय पोळी भाजण्यासाठी प्रत्येक कार्यक्रमामध्ये पाणी आणू अशा घोषणा करणारे टॅंकरप्रश्नी काही बोलण्यास तयार नाहीत. गावच्या पाणी प्रश्नापेक्षा खटाव तालुक्यातील पाणी प्रश्नामध्ये धाव घेत मोर्च्यात सामील झाले, मात्र आपल्या शहरातील पाणी पुरवठा दहा ते पंधरा दिवस होत नाही, याचे देणे-घेणेच राहिले नाही. शहरातील नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी मैलभर पायपीट करावी लागत आहे. नगरपंचायत अधिकारी अजूनही कागदोपत्री चालले आहेत. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांचे मोठे हाल होत आहेत.
दहिवडी नगरपंचायतीचा चार हजार लिटरच्या टॅंकरने होणारा पाणी पुरवठा नागरिकांना कितपत पुरतो याची जाणीव मात्र नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी व लोकप्रतिनिधी यांना असल्याचे दिसत नाही. टॅंकर दहा ते पंधरा दिवस वाड्या वस्त्यांवरती फिरकत नाही, त्याबरोबर शहरातील नागरिकांनादेखील दहा ते पंधरा दिवस पाणीच नळाला सोडले गेले नाही. यामुळे नागरिक व शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. पंधरा हजार लोकसंख्या व तालुक्याचे मुख्य ठिकाण असणाऱ्या शहरातच एवढा मोठा पाण्याचा प्रश्न निर्माण होत असेल तर प्रशासन व लोकप्रतिनिधी करतात तरी काय? असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. ना शहराला पुरेसे पाणी ना वाड्या वस्त्यांमध्ये यामुळे शहरी भागातील नागरिकांनादेखील वाड्या वस्त्यांवरती सायकलवरून पाणी आणावे लागत आहे. तसेच कपडे धुण्यासाठी देखील हात पंपावरती जावे लागत आहे. टॅंकरची संख्या वाढवणे गरजेचे आहे. मात्र नगरपंचायत मधील राजकारण पाहता यात हाल मात्र नागरिकांचे होत असल्याचे दिसत आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा