दहा हजार कोटी रूपयांच्या साम्राज्याचा मालक

नवी दिल्ली – झोपडीत राहणाऱ्या आसुमल सिरूमलानी नावाच्या एका गरीब इसमाने संत आसाराम बापू बनून चार दशकांच्या आपल्या वाटचालीत तब्बल दहा हजार कोटी रूपयांचे साम्राज्य उभारले असल्याची माहिती त्याचा तपास करताना उघड झाली आहे. सत्तरच्या दशकात हा इसम साबरमती नदीच्या किनारी एक झोपडी बांधून राहात होता. आज त्याचे जगभरात चारशेहून अधिक आश्रम असून या आश्रमाच्या नावावर शेकडो एकर जमीनी आहेत.

आसारामचे मुळ नाव आसुमल सिरूमलानी असे असून त्याचा जन्म 1941 साली पाकिस्तानातल्या सिंध प्रांतातील बेरानी गावात झाला आहे. 1947 साली फाळणीनंतर त्याचे कुटुंब त्याच्यासह भारतात दाखल झाले आणि ते अहमदाबादला स्थायिक झाले. स्वत: आसाराम केवळ इयत्ता चौथी पास आहे. मणिनगर भागातील शाळेत तो शिकला आहे. वयाच्या दहाव्या वर्षी त्याचे वडिल थौमल यांचे निधन झाल्यानंतर त्याने शाळा सोडली. त्याने स्वत:ची जी डॉक्‍युमेंटरी काढली आहे त्यातील माहितीनुसार तो तरूण वयातच अध्यात्माकडे वळला नंतर तो हिमालयात गेला. तिथे त्याला त्याचे गुरू लिलाशहा बापू हे भेटले. त्याच्या गुरूने त्याला 1964 मध्ये आसाराम असे नाव दिले.

1970 च्या दशकात आसाराम पुन्हा गुजरातेत आला अणि साबरमतीच्या किनारी झोपडी बांधून राहु लागला. 1972 साली त्याने तेथे मोक्ष कुटीर नावाचा एक झोपडीवजा आश्रम सुरू केला. तेव्हापासून त्याच्या भरभराटीला प्रारंभ झाला. त्यानंतरच्या चाळीस वर्षात त्याने भारतात आणि जगात अनेक ठिकाणी मिळून एकूण चारशे आश्रम स्थापन केले आहेत. आजही त्याच्या मोतेरा येथील मुळ आश्रमात भक्तांची रोजच गर्दी होत असते. आपल्या गुरूंना पोलिसांनी खोट्या प्रकरणात अडकवले आहे अशी त्यांची भावना आहे. आसाराम हा विवाहीत असून त्याला लक्ष्मीदेवी नावाची पत्नी आणि नारायणसाई हा मुलगा आणि भारतीदेवी ही मुलगी असा परिवार आहे.

सन 2008 साली आसाराम प्रथम वादाच्या भोवऱ्यात सापडला जेव्हा त्याच्या मूळ आश्रमात राहणारे त्याचे दोन भाचे दिपेश आणि अभिषेक वाघेला हे तेथेच मृतावस्थेत आढळले होते. राज्य गुप्तचर विभागाने या प्रकरणाचा छडा लाऊन या प्रकरणात आसारामच्या सात भक्तांवर त्यांच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. सूरत आणि अहमदाबाद येथे त्याच्या विरोधात जमीनी जबरदस्तीने बळकावल्याचेही काही गुन्हे दाखल आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)