दहा वर्षे अनुभव असेल, तर करता येणार पीएच.डी.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला स्वायत्तता दर्जा मिळाल्याने मार्ग मोकळा


यापूर्वीच्या नियमांंना यूजीसीने घातली होती बंदी


पात्रता प्रवेश परीक्षेतून मिळणार सवलत

पुणे- एखाद्या क्षेत्रात दहा वर्षांचा अनुभव असल्यास, त्यांना पीएच.डी. पूर्व प्रवेश परीक्षेतून (पेट) सवलत दिली जात होती. मात्र विद्यापीठ अनुदान आयोगाने अशा प्रकारे पीएच.डी. प्रवेशाला मनाई केली होती. मात्र, आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला स्वायत्तता दर्जा मिळाल्याने, दहा वर्षे अनुभव असणाऱ्या व्यक्‍तींना पुन्हा पीएच.डी. दारे खुली करण्यात येणार आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी दिली.

पीएचडी प्रवेशासाठी सेट अथवा नेट उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पीएचडी पूर्व प्रवेशतून सूट आहे. त्याच धर्तीवर एखाद्या क्षेत्रात किमान दहा वर्षे कार्यरत असेल, त्या व्यक्‍तींना पीएचडी करता यावी, त्यासाठी त्यांना पीएचडी प्रवेश परीक्षा देण्याची गरज नाही, असा निर्णय तत्कालीन कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी घेतला होता. त्यानुसार अशा व्यक्‍तींची पीएच.डी. सध्या विद्यापीठात सुरू आहे.

दरम्यान, विद्यापीठ अनुदान आयोगाने एकाच क्षेत्रात दहा वर्षे अनुभव असणाऱ्या व्यक्‍तींना पीएचडी करता येणार नाही, असे निर्देश सर्व विद्यापीठांना दिले होते. त्यानुसार पुणे विद्यापीठाने ही प्रवेश प्रक्रिया बंद केली. त्यामुळे अशा व्यक्‍तींना पीएच.डी.ची दारे बंद झाली होती. आता पुन्हा ही संधी मिळणार असल्याची चिन्हे आहेत.

यासंदर्भात कुलगुरू डॉ. नितीन करमळकर म्हणाले, विद्यापीठाला स्वायत्तता दर्जा जाहीर झाला आहे. येत्या तीन-चार दिवसांत हे पत्र प्राप्त होणार आहे. त्याबाबतचे सविस्तर सादरीकरणही राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे केले जाणार आहे. आता हा दर्जा मिळाल्याने दहा वर्षे कोणत्याही क्षेत्राचा अनुभव असेल, त्या व्यक्‍तींना पीएच.डी. पदवीला प्रवेश दिला जाणार आहे. त्यांना कोणतीही प्रवेश परीक्षा द्यावी लागणार नाही, त्याबाबत विद्यापीठ पातळीवर विचार सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

ज्येष्ठ नागरिकांनाही पीएच.डी.ची संधी
ज्येष्ठ नागरिकांनाही पीएच.डी. करण्याची संधी मिळाली पाहिजे, या मताचा मी आहे. ज्येष्ठ नागरिकांनाही पीएचडी करता यावा, यासाठी नियमावली करण्याची कार्यवाही सुरू आहे. एखादे ज्येष्ठ नागरिक पीएच.डी. करत असतील, ते स्वागतार्ह म्हणावे लागेल. याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)