दहा ते बारा जागांवर उमेदवार उभे करण्याचा बैठकीत निर्णय 

कराड – काही दिवसांवर येवून ठेपलेली मलकापूर नगरपरिषद निवडणूक शिवसेना नगराध्यक्ष पदासह ताकदीने लढणार आहे. सदर निवडणुकीची व्यूहरचना ठरविण्याकरीता मलकापूर शहरातील शिवसैनिकांची बैठक तालुकाप्रमुख नितीन काशिद यांच्या अध्यक्षतेखाली व शहर प्रमुख मधुकर शेलार, उपशहर प्रमुख सुर्यकांत मानकर, महिला आघाडी जिल्हा संघटक अनिता जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच पार पडली.

यावेळी बोलताना नितीन काशीद म्हणाले, पालिका सभागृहात शिवसेनेचा सदस्य नसतानाही सभागृहा बाहेरुन विरोधी पक्षांची प्रभावी भूमिका शिवसेनेने बजावली आहे. शहराच्या विकास कामांबरोबरच नागरी सेवा-सुविधा, अन्यायकारक विकास आराखडा, वाढीव घरपट्टी, पाणीपट्टी, मंडईचा प्रश्न, रखडलेले ड्रेनेज, दूषित पाणीपुरवठा, कराड-नांदलापूर रोड आदी महत्त्वाच्या प्रश्नावर शिवसेनेने आंदोलनात्मक व चर्चात्मक मार्गाने लढा देऊन बहुतांशी समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला आहे व सोडवल्या आहेत.

गेल्या पाच वर्षात केवळ सवंग लोकप्रिय उपक्रमाच्या घोषणा झाल्या. ड्रेनेजचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प रेंगाळलेला आहे. 20 कोटींची आर्थिक तरतूद 2017-18 या आर्थिक वर्षात करुनही एकही दर्जेदार रस्ता आज अखेर पूर्ण नाही. विकास आराखड्यातील अत्यावश्‍यक बाबी केवळ कागदावरच आहते. वाढत्या लोकसंख्येनुसार 24 बाय 7 पाणीपुरवठा योजनेवर ताण पडला असून याबाबतचे नियोजन प्रलंबित आहे. सदर योजनेचे अस्तित्व धोक्‍यात आहे.कराड-नांदलापूर राज्यमार्ग वादाच्या भोवऱ्यात असून गेली 10 वर्षे सदर मार्गावर डांबर पडलेच नाही. अनेक विकास कामे प्रलंबित असून विकासाचा वेग मंदावून दिशाहीन झाला आहे.

या सर्व बाबी व समस्यांचे निराकरण करता विकासात्मक दृष्टीकोन ठेवून शिवसेना विकासाच्या परिवर्तनाच्या मुद्यांवर निवडणुकीस सामोरे जात आहे. समविचारी पक्षांशी युती करण्याबाबत वरिष्ठांशी चर्चा करुन पुढील रणनिती ठरविण्यात येईल. सद्यस्थितीत शिवसेना 10 ते 12 जागांवर उमेदवार उभे करणार आहे. सदर बैठकीस उपतालुका प्रमुख काकासो जाधव, दिलीप यादव, संजय चव्हाण, विभागप्रमुख धनाजी पाटणकर, संतोष सुपनेकर,  डॉ. संदीप माने, नरेंद्र लोहार, रुपाली माळी, कलावती माळी, पद्मा जाधव, विजय तिवारी, आण्णा रेंदाळकर, युवराज पाटणकर, राजेंद्र रेडेकर, जगन्नाथ पवार, ओंकार काशिद, इच्छुक उमेदवार उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)