दहावी, बारावी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

राज्य शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर वेळापत्रक उपलब्ध

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आले. त्यानुसार बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी 2019 पासून, तर दहावीची परीक्षा येत्या 1 मार्चपासून सुरू होणार आहे, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.

-Ads-

विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने बोर्डाकडून दरवर्षी दहावी व बारावी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध केले जाते. शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, विद्यार्थ्यांना दहावी व बारावीच्या अभ्यासाचे नियाजन करता यावे, हा संभाव्य वेळापत्रकाचा हेतू आहे. या परीक्षेच्या तारखा शुक्रवारी राज्य शिक्षण मंडळाने प्रसिद्ध केले.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा अर्थात बारावीची परीक्षा दि. 21 फेब्रुवारी ते 20 मार्च 2019 या कालावधीत होणार आहे. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच दहावीची परीक्षा 1 मार्च ते 22 मार्च या दरम्यान होईल. याबाबतचे अधिकृत वेळापत्रक राज्य शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे. यंदाच्या दहावीचा पुनर्रचित अभ्यासक्रम असल्याने पुनर्परीक्षार्थींसाठी अंतिम संधी असलेले जुन्या अभ्यासक्रमाचे स्वतंत्र वेळापत्रक तयार करण्यात आलेले आहे.

संभाव्य वेळापत्रकाची सुविधा ही फक्‍त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी शाळा व महाविद्यालयांकडे छापील स्वरुपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी. त्यानुसार परीक्षेला सामोरे जावे. या संभाव्य वेळापत्रकाबाबत काही सूचना, हरकती असल्यास त्या संबंधित विभागीय मंडळाकडे 15 दिवसांच्या आत लेखी स्वरुपात पाठवाव्यात, असे आवाहन भोसले यांनी केले आहे.

व्हायरल वेळापत्रक ग्राह्य धरू नये
दहावी व बारावीच्या लेखी परीक्षेचे वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केले जाते. त्याबाबतचे अधिकृत वेळापत्रकही छापील स्वरुपात मंडळाकडून संबंधित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना पाठविले जातात. मात्र, अन्य संकेतस्थळावरून किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्‌स ऍप किंवा अन्य माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असेही राज्य शिक्षण मंडळाने स्पष्ट केले.

What is your reaction?
3 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)