दहावीच्या बदलणाऱ्या प्रश्‍नपत्रिकेमुळे गोंधळ

सत्र संपत आले, तरी प्रशिक्षणाचा पत्ता नाही; विद्यार्थ्यांना फायदा होणार कधी?

नगर राज्य शिक्षण मंडळाने अभ्यासक्रम बदलाच्या पार्श्‍वभूमीवर एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयांतर्गत प्रश्‍नपत्रिकेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्‍नांच्या स्वरूपामध्ये बदल करण्यात येणार आहे. त्यानुसार दहावीचा बदललेला अभ्यासक्रम आणि बारावीच्या भाषा विषयाच्या प्रश्‍नपत्रिकांच्या स्वरूपात बदल करण्यात येणार आहे. तो करायलाही हरकत नाही; परंतु अजूनही शिक्षकांना प्रशिक्षण नाही. शिक्षकांचे प्रशिक्षण होणार कधी आणि ते विद्यार्थ्यांपर्यंत पोचणार कधी असे प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत.
बालभारतीच्या विविध विषयांच्या अभ्यासमंडळातर्फे यंदा दहावीचा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. त्यानुसार बालभारतीच्या विषयतज्ज्ञांनी मूल्यमापन पद्धतीचा आराखडादेखील तयार केला आहे. या मूल्यमापन आराखड्यानुसार प्रश्‍नपत्रिकांचे स्वरूप बदलण्यात येणार आहे. त्याची शिक्षकांना माहिती देण्यासाठी शिक्षण मंडळातर्फे सप्टेंबर महिन्यात विशेष कार्यशाळा घेण्यात येणार आहे. या कार्यशाळेत राज्यभरातील ठरावीक शिक्षकांना बोलविण्यात येणार आहे. दहावीच्या बदलेल्या अभ्यासक्रमातील प्रश्‍नपत्रिकांमधील प्रश्‍नांची ही नवी पद्धत सध्याच्या पद्धतीपेक्षा पूर्णपणे वेगळी असेल. विशेषत्वाने भाषा विषयांच्या प्रश्‍नपत्रिकांमध्ये प्रश्‍न वेगळे असतील. नवीन पद्धतीत कृतीपत्रिकेवर आधारित तसेच उपयोजनात्मक प्रश्‍नांवर भर देण्यात येणार आहे. हे प्रश्‍न तयार करताना विद्यार्थ्यांच्या अभ्यास व लेखनकौशल्याचे आकलन केले जाणार आहे.
नवीन अभ्यासक्रम आणि प्रश्‍नपत्रिका तयार करताना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांना सीबीएसई पद्धतीच्या विद्यार्थ्यांच्या तोडीचे शिक्षण मिळावे, हा उद्देश आहे. “जेईइ’ व “नीट’च्या परीक्षेत महाराष्ट्राच्या शिक्षण मंडळाचे विद्यार्थी कमी पडतात. सीबीएसईच्या परीक्षा मंडळाच्या विद्यार्थ्यांची वेगळी तयारी न करून घेताही त्यांना त्यात चांगले यश मिळते. या पार्श्‍वभूमीवर नव्या अभ्यासक्रमाची रचना तसेच प्रश्‍नपत्रिकांची रचना सीबीएसईच्या धर्तीवर करण्याच्या योजनेबाबत वेगवेगळी मते व्यक्त होत आहे. मुलांना अभ्यासक्रम झेपण्यापासून अनेक मतप्रवाह होते. पहिलीपासूनच अभ्यासक्रमाची तशी पुनर्रचना करायला हवी. तसे न करता थेट दहावीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला. आता त्यावर फार चर्चा करण्याची आवश्‍यकता नसली, तरी अभ्यासक्रमाच्या बदलानंतर लगेच प्रश्‍नपत्रिका बदलाचा आग्रह मात्र वादात सापडला आहे.
गेल्या काही वर्षांत राज्य मंडळाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या रोडावत चालली असून, सीबीएसईकडे विद्यार्थी व पालकांचा कल वाढला आहे. या स्पर्धेत टिकण्यासाठी मंडळाकडून नवनवे प्रयोग केले जात आहेत. दहावीच्या बदललेल्या अभ्यासक्रमानुसारच कृतिपत्रिकांवर आधारित प्रश्‍नपत्रिका असणार आहेत. बदललेल्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात आले आहे. बारावीच्या भाषा विषयांसाठी देखील कृतिपत्रिका लागू करण्यात आल्या आहेत. या विषयांच्या प्रश्‍नपत्रिकेच्या स्वरूपातदेखील बदल करण्यात येणार आहेत. प्रश्‍नपत्रिका बदलायला कुणाचा विरोध नाही; परंतु दहावीचे वर्ग सुरू होऊन आता तीन महिने होत आले आहेत. या महिन्यात शिक्षकांचे प्रश्‍नपत्रिकांसंबंधी प्रशिक्षण होणार आहे. असे प्रशिक्षण घेणाऱ्या शिक्षकांची संख्या मर्यादित असेल. त्यानंतर हे शिक्षक अन्य शिक्षकांना प्रशिक्षण देणार आहेत. त्यात अजून किती वेळ जाणार, हे कळायला मार्ग नाही. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थी, शिक्षक व पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

परीक्षा पाच महिन्यांवर

दहावी, बारावीच्या परीक्षेच्या तारखा वर्ष सुरू होताना जाहीर करणारे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ परीक्षेला पाच महिने असतानाही अजून शिक्षकांचे प्रशिक्षण सुरू करू शकले नाही. शिक्षकांचे प्रशिक्षण होणार कधी आणि त्याचा विद्यार्थ्यांना फायदा कधी होणार, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)