नाणे मावळ – शैक्षणिक वर्ष 2018-19 च्या इयत्ता दहावी एस. एस. सी. बोर्डाच्या परीक्षेला शुक्रवारपासून (दि. 1) सुरुवात झाली.नाणे मावळातील उषाताई चॅरिटेबल ट्रस्ट सांगिसे, गोल्डन ग्लेड्स माध्यमिक विद्यालय करंजगाव, एकवीरा विद्यामंदिर कार्ला, पंडित नेहरू विद्यालय कामशेत, जैन इंग्लिश स्कूल, कामशेत, आश्रम शाळा कामशेत व व्ही. आय. टी. खामशेत शाळेतील दहावीच्या 640 विद्यार्थ्यांनी कामशेतच्या पंडित नेहरू विद्यालय कामशेत दहावीच्या परीक्षा केंद्रावर परीक्षेला सुरुवात केली, अशी माहिती केंद्र प्रमुख डी. वाय. साळुंखे यांनी दिली.
परीक्षेचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी जैन इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका तनुश्री शुक्ला उपकेंद्र प्रमुख म्हणून भूमिका बजावत आहे. परीक्षेच्या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस अधिकारी बी. बी. पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
तळेगाव नगरीचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळकेंकडून विद्यार्थ्यांना यावेळी पेनचे वाटप करण्यात आले. या वेळी त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर परीक्षेसाठी वेळेवर येण्यासाठी मोफत वाहतूक सेवेची सोय स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून, तळेगाव नगरीचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळकेंकडून करण्यात आली. हा उपक्रम त्यांच्याकडून दरवर्षी राबविण्यात येत आहे.
या मोफत वाहतूक सेवेची सोय उपलब्ध झाल्याने विद्यार्थी व पालक वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले. शाळा ते परीक्षा केंद्रावर मोफत वाहन असल्याने विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या काळातील अत्यंत महत्त्वाचा वेळ वाचू शकतो आणि पालकांच्या खिशावरील ताण हलका होण्यास मदत होणार आहे, अशी प्रतिक्रिया काही विद्यार्थ्यांनी दिली. परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन शेळके यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणार असल्याची ग्वाही काही विद्यार्थ्यांनी दिली.