दहावीच्या नविन येणाऱ्या पाठ्यपुस्तकाबाबत चर्चासत्र

अभ्यास मंडळातील सदस्यांची नावे अजुनही गुलदस्त्यात
पुणे – यंदाच्या वर्षी नेमक्‍या कोणत्या इयत्तांचे अभ्यासक्रम बदलणार इथपासून ते अगदी हा अभ्यासक्रम ठरवणारी मंडळी कोण, इथपर्यंत गुलदस्त्यात ठेवली गेलेली माहिती अखेर शासनाने सर्वांना उपलब्ध करुन देण्यास सुरुवात केली आहे असे म्हणावे लागेल. बालभारतीचे इयत्ता दहावीच्या नविन येणाऱ्या पाठ्यपुस्तकाबाबत मुंबईमध्ये चर्चासत्राचे आयोजन केले आहे.

बालभारतीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बालभारतीच्या वतीने इयत्ता 1 ली ते 12 वी पर्यंतच्या शालेय पुस्तकांची निर्मिती करण्यात येते. यावर्षी शैक्षणिक वर्ष 2018-19 करिता इयत्ता दहावीची सर्व माध्यमांची पुस्तके नवीन अभ्यासक्रम आराखड्यानुसार तयार करण्यात येत आहेत. या नवीन अभ्यासक्रमावर आधारित पुस्तकाविषयी चर्चासत्राचे आयोजन दि.4 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजता शिवाजी नाट्य मंदिर, दादर येथे करण्यात आले आहे.

इयत्ता दहावीच्या या नवीन पाठ्यपुस्तकांची ओळख व्हावी, पाठ्यपुस्तकांचे स्वरूप समजावे, मूल्यमापन प्रक्रिया इत्यादीबाबत चर्चा व्हावी या हेतूने ही कार्यशाळा आयोजित केली आहे. तसेच या चर्चासत्रात सर्व विषयाच्या विषय समित्यांचे अध्यक्ष मार्गदर्शन करणार असून विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्या शंकाचे निरसन केले जाणार आहे. सदर चर्चासत्रास उपस्थित राहण्यासाठी प्रवेशपत्रिका आवश्‍यक असून एका प्रवेशपत्रिकेवर विद्यार्थी व पालक असे दोन जण उपस्थित राहू शकतात. या प्रवेशिका गणेश बुक सेंटर, एसव्ही रस्ता, बोरिवली, एच.के.बुक एजन्सी, सुर्यनगर विक्रोळी, धनलाल ब्रदर्स, एस गांधी मार्ग, मुंबई, आयडियल बुक डेपो दादर, जवाहर बुक डेपो, विलेपार्ले, विकम बुक डेपो, टी.एम.खारकळ आळी रस्ता, ठाणे, राकेश बुक स्टेशन, पनवेल व गणेश जनरल स्टोअर्स, डोंबिवली येथे उपलब्ध होतील. दरम्यान हा अभ्यासक्रम कोणी ठरविला आहे हा एकूणच प्रकार अद्याप गुलदस्त्यात आहे. आता या चर्चासत्राच्या माध्यमातून पहिल्यांदा ही समिती सर्वांसमोर येणार आहे.

चर्चासत्रे राज्यभर व्हावीत
दहावीच्या नविन अभ्यासक्रमाचे स्वरुप, मुल्यमापन प्रक्रिया, पुस्तके कशी असतील याबाबत केवळ मुंबई नव्हे तर राज्यातील शिक्षक, क्‍लासचालक, पालक व विद्यार्थ्यांना उत्सुकता आहे. दहावीच्या अभ्यासक्रमाबाबत राज्यभरातील शिक्षक सातत्याने मागणी करत असल्याने या चर्चासत्राचे आयोजन केले आहे. मात्र अशी चर्चासत्र केवळ मुंबईत नव्हे तर राज्यभर घ्यावीत अशी मागणी शिक्षणतज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. दरम्यान चर्चासत्राबाबत माहिती मिळाली असली तरीही पुस्तके प्रत्यक्षात कधी बाजारात येणार याबाबत अजुनही संभ्रमावस्था आहे. याबाबत दैनिक प्रभातने बालभारतीचे संचालक सुनील मगर यांना याबाबत अनेकदा विचारणा केली असता पुस्तके येतील तेव्हा आम्ही सांगू असेच उत्तर त्यांच्याकडून मिळाले.

बालभारती घेणार पुस्तकांचे कॉपीराईट
बालभारतीच्या पुस्तकांचे आतापर्यंत कॉपीराईट नसल्याने कोणीही पुस्तकातील मजकूर वापरत होते. मात्र आता शासनाने इयत्ता पहिली ते बारावीच्या पुस्तकांवर कॉपीराईट सांगण्याची तयारी केली आहे. त्यामुळे बालभारतीच्या महसुलात चांगलीच वाढ होणार असल्याचे चित्र आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
48 :thumbsup:
26 :heart:
11 :joy:
23 :heart_eyes:
11 :blush:
2 :cry:
19 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)