दहाची नाणी घेण्यास बॅंकाकडून नकार

वाघोली- वाघोली (ता. हवेली) येथील काही बॅंका दहा रुपयाची नाणी स्विकारण्यास नकार देत असल्यामुळे सामान्य नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे. आयडीबीआय बॅंक, महाराष्ट्र बॅंक दहा रुपयाचे नाणी घेण्यास ग्राहकांना स्पष्ट नकार देत आहे, त्यामुळे सामान्य ग्राहकांना या पैशाचे करायचे काय असा प्रश्‍न पडला आहे.
भारतीय रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) ग्राहकांना दैनंदिन व्यवहारासाठी अडचण निर्माण होऊ नये म्हणून दहा रुपयाच्या नाण्यांची निर्मिती केली. दहा रुपयाचे नाणे चलनातून बाद झाल्याची अफवा काही नागरिक, व्यापाऱ्यांकडून पसरविली जात आहे. बाजारामध्ये अनेक ठिकाणी दुकानदार, व्यापारी, पंप चालक दहा रुपयाची नाणी नाकारत असतांनाचे चित्र आहे. पाच किंवा दहा रुपयांचे चलनी नाणे व्यवहारातून बाद झालेले नसताना बॅंकांच नाणी घेण्यास नकार देत असतील तर त्या बॅंकांवर कारवाई होणे गरजेचे आहे. सामान्य ग्राहक मोठ्या कष्टाने एक एक पैसा जमा करतो आणि भविष्याची सुरक्षित तरतूद म्हणून बॅंकमध्ये जमा करण्यासाठी जातो, त्यावेळी बॅंकेकडून दहाची नाणी घेण्यास स्पष्ट नकार देवून रिझर्व बॅंकेचे आदेश असल्यामुळे घेता येत नाही, असे सांगून पैसे स्वीकारण्यास नकार दिला जात आहे.
वाघोली येथील एका ग्राहकाच्या मुलाने आयडीबीआय बॅंकेत खाते उघडले. पैशामुळे भविष्यात शिक्षणात अडचण निर्माण होऊ नये व आपल्या वडिलांवर आर्थिक बोजा पडू नये, याकरिता स्वतः दहा-दहा रुपयाचे कॉईन जमा करून आयडीबीआय बॅंकेत भरण्यासाठी त्याने वडीलाला ( दि. 12 जून) पाठवले तेंव्हा कॅशिअरने नाणी घेण्यास नकार दिला. याबाबत ग्राहकाने त्यांना तसे लेखी द्या, असे म्हणताच समोर रिझर्व बॅंकेचे सूचनापत्र वाचा, असे सांगण्यात आले. त्यावर ग्राहकाने ते इंग्रजीमध्ये आहे वाचता येत नाही, असे सांगताच वाद नको म्हणून कॅशिअर महिलेनी दुसऱ्या कर्मचाऱ्याकडे पाठवले. पत्रामध्ये रिझर्व बॅंकेने दहाचे कॉईन घेऊ नका, अशा स्पष्ट सूचना असल्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही, तुम्ही कुठेही तक्रार करा, असे या कर्मचाऱ्याने सांगितले. ग्राहकाने बॅंक व्यवस्थापकाला भेटण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांची भेट होऊ शकली नसल्यामुळे ग्राहकाने थेट वरिष्ठांशी संपर्क करून बॅंक दहाची नाणी स्वीकारत नसल्याची तक्रार केली. त्यानंतर ग्राहकाची नाणी जमा करून घेण्यात आली असली तरी मात्र मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या संबधित अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्राहकांकडून केली जात आहे.

  • दहा रुपयाची नाणी बंद झालेली नसताना देखील बॅंका चलन स्वीकारण्यास नकार देत असतील तर फार मोठा गुन्हा आहे. चलन घेण्यास नकार देणाऱ्या बॅंकांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे. बॅंकांनी पाच, दहाचे कॉईन घेण्यास नकार दिल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल.
    – ऍड. गणेश मस्के, पुणे जिल्हा उपाध्यक्ष, मनसे
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)