दहशतवाद हा जगाच्या विकास आणि समृद्धीसाठी असलेला धोका

शांघाय सहकार्य संघटनेत सुषमा स्वराज यांचे सहकार्याचे आवाहन 

दुशान्ब (ताझिकीस्तान): दहशतवाद हा जगाच्या विकास आणि समृद्धीसाठी असलेला धोका आहे. त्याच्या मुकाबल्यासाठी एकमेकांना सहकार्य करण्याचे आवाहन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी “शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्यांना केले आहे. “एससीओ’मध्ये पाकिस्तानही सदस्य आहे.

चीन आणि पाकिस्तान दरम्यानच्या आर्थिक कोरिडोरचा उल्लेख करून स्वराज यांनी ही संलग्नता तत्वांच्या आधारावर असायला हवी, असा आग्रह धरला. सार्वभौमत्व आणि भौगोलिक एकसंधता, विचारविमर्श, सुशासन, पारदर्शकता, व्यवहार्यता आणि चिरस्थायीत्वाचाही मान राखला जायला हवा, असेही स्वराज म्हणाल्या. भारताने “सीपीईसी’ प्रकल्पाला विरोध केला आहे. हा प्रकल्प पाकिस्तान व्याप्त काश्‍मीरमधून जाणार असल्याने चीनकडेही या प्रकल्पाबाबतचा विरोध नोंदवला आहे. शांघाय सहकार्य संघटनेच्या दोन दिवसांच्या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी स्वराज ताजिकीस्तानच्या राजधानीमध्ये आल्या आहेत.

दहशतवादाची व्याप्ती वाढत असल्याने देशांनी आपली राष्ट्रीय जबाबदारी ओळखावी आणि एकमेकांना सहकार्य करावे, असे आवाहन स्वराज यांनी पाकिस्तानचे विदेश मंत्री शाह मोहमूद कुरेशी यांच्या उपस्थितीतच केले.
जागतिकीकरणाचा आपल्याला फायदा झाला आहे. आपल्याला व्यापार आणि गुंतवणूकीत सहकार्य वाढवायला लागणार आहे. जागतिक व्यापार संघटनेच्या माध्यमातून स्थिर आणि खुल्या आंतरराष्ट्रीय व्यापाराला आमचा पाठिंबा आहे, असेही स्वराज यांनी सांगितले.

“एससीओ’च्या किंगदाव परिषदेतल्या कट्टरतावादाविरोधात युवकांना केलेल्या आवाहनाला भारताने सक्रियपणे पाठिंबा दिला आहे. शांघाय सहकार्य संघटनेच्या शांती अभियान 2018 अंतर्गत दहशतवाद विरोधी युद्ध सरावाचे प्रथमच आयोजन करण्यात आले होते. त्याच्या यशस्वितेबाबत त्यांनी सहकारी देशांचे अभिनंदनही केले.

किंगदाव परिषदेच्यावेळी “एससीओ’ने केलेल्या अफगाणिस्तान संपर्क गटाचेही स्वागत स्वराज यांनी केले आणि “एससीओ’च्या या संपर्क गटाची पुढील बैठक भारतात व्हावी, अशी ईच्छा व्यक्‍त केली. रशिया, चीन, किरगिझ प्रजासत्ताक, कझाकिस्तान, ताजिकीस्तान आणि उझबेकिस्तानच्या अध्यक्षांच्या पुढाकाराने शांघाय सहकार्य संघटनेची स्थापना 2001 साली झाली. भारत आणि पाकिस्तान हे गेल्याच वर्षी या संघटनेचे सदस्य बनले आहेत.”


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)