दहशतवादी संघटनांना नापाक पाठिंबा देणे थांबवा

भारतीय लष्कराचा पाकिस्तानला सज्जड इशारा
नवी दिल्ली – काश्‍मीरवर वक्रदृष्टी ठेवणाऱ्या पाकिस्तानला आज भारतीय लष्कराने सज्जड इशारा दिला. जम्मू-काश्‍मीरमध्ये दहशतवादी संघटनांना नापाक पाठिंबा देण्याचे थांबवा, असे भारतीय लष्कराने त्या देशाच्या लष्कराला बजावले.

भारतीय लष्कराच्या लष्करी मोहिमांचे महासंचालक (डीजीएमओ) लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांचे आज पाकिस्तानच्या डीजीएमओशी दूरध्वनीवरून संभाषण झाले. पाकिस्तानच्या विनंतीवरून हॉट लाईनवरून हे संभाषण झाले. यावेळी भारतीय सुरक्षा दले नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत चिथावणीखोर गोळीबार करत असल्याचा कांगावा पाकिस्तानी डीजीएमओने केला. त्यावर चौहान यांनी त्यांना सुनावले. सीमेपलिकडून घुसखोरी करून सशस्त्र दहशतवादी भारतीय लष्कराच्या नाक्‍यांना लक्ष्य करतात. त्या दहशतवाद्यांना पाठिंबा देण्याचे पाकिस्तानी लष्कराचे सत्र सुरूच आहे. त्यामुळे भारतीय जवान केवळ प्रत्युत्तरादाखल मारा करतात.

एलओसीलगतचा तणाव कमी करण्याची संपूर्ण जबाबदारी पाकिस्तानची आहे, असे चौहान यांनी संभाषणावेळी स्पष्ट केले. पाकिस्तानी लष्कराकडून दहशतवादाला दिला जाणारा पाठिंबा अस्वीकारार्ह आहे. नापाक कृत्यांना प्रत्युत्तर देण्याचे आमचे धोरण कायम राहील, असेही त्यांनी ठणकावले. पाकिस्तानी सैनिक वारंवार शस्त्रसंधीचा भंग करून एलओसीलगत असणाऱ्या जम्मू-काश्‍मीरच्या भागांत मारा करतात. दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत घुसखोरी करणे सुलभ व्हावे यासाठी पाकिस्तानी सैनिक मारा करत असल्याचे उघड गुपित आहे. त्या माऱ्याला भारतीय सुरक्षा दलांकडून चोख प्रत्युत्तर दिले जाते. त्यात पाकिस्तानी बाजूची मोठी हानी होत असूनही त्या देशाला शहाणपण सुचण्याची चिन्हे नाहीत. उलट, शस्त्रसंधी भंगाबाबत त्या देशाकडून उलट्या बोंबा मारल्या जातात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)