दहशतवादी घुसल्याच्या बातमीने सातारकर हादरले

 

पोलिसांचे मॉकड्रील असल्याचे कळताच सोडला नि:श्‍वास

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सातारा, दि. 6 (प्रतिनिधी) –

रविवारची दुपार असल्याने शहरात लोकांची मोठी वर्दळ, सुट्टीमुळे बहुतांश शहर सुट्टीच्या मूडमध्ये. अशातच 3 दहशतवाद्यांनी बसस्थानकाजवळील सेव्हन स्टार या इमारतीत पिक्‍चर पाहण्यास आलेल्या लोकांना ओलीस ठेवल्याची बातमी कानी पडली आणि सातारकर हादरले.

सगळीकडे पळापळ होत असताना पोलिस कार्यालयातील फोन माहितीसाठी खणाणू लागले. कमांडो-बॉम्बशोधक – विशेष पोलिसांची पथके, पोलिस अधिकारी, अग्निशमन दलाने इमारतीला वेढा घातला. तासभर चाललेल्या या कारवाईत मॉलमध्ये शिरून हैदोस घालणा-या तीन अतिरेक्‍यांना पकडण्यात यश मिळाले. अर्थातच, हे होते मॉक ड्रिल. कारवाई संपल्यानंतर पोलिसांनीच शहराची सुरक्षितता पडताळण्यासाठी सराव असल्याचे जाहीर केल्यावर सातारकरांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला.

अलीकडच्या काळात धोक्‍यात आलेली देशाची कायदा व सुव्यवस्था, देशभरात झालेले बॉम्बस्फोट, अतिरेक्‍यांनी जाहीर केलेली बॉम्बस्फोट घडविण्याची सांकेतिक भाषेतील यादी या सर्व पार्श्‍वभूमीवर राज्यातील अनेक शहरे संवेदनशील बनली आहेत. त्याचाच भाग म्हणून सातारा पोलिसांनी या परिस्थितीमध्ये नागरिकांनी काय तयारी करावी. तसेच पोलिसांची किती तयारी आहे . याची माहिती तपासण्यासाठीच मॉक ड्रील घेतल्याचे सहाय्यक पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी सांगितले.

सकाळी अकरा वाजता कंट्रोलरूममध्ये आलेल्या फोननंतर सुरू झालेल्या या कारवाईमध्ये पोलिसांनी सेव्हन स्टार इमारतीमध्ये आधीच शिरलेल्या अतिरेक्‍यांनी विविध प्रकारे चकविण्याचा व थकविण्याचा प्रयत्न केला. पण, कमाडोंना मिळालेले प्रशिक्षण, तयारी व पोलिसांनी केलेली योग्य ती कारवाई फळास येऊन बनावट अतिरेक्‍यांना जेरबंद करण्यात यश आले.

साताऱ्याचे जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख,यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली दंगा नियंत्रण पथक,जलद कृती दल, दहशतवाद विरोधी पथक, बॉम्ब नाशक पथक,सातारा शहर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी या मॉक ड्रीलमध्ये सहभाग घेतला.

पोलिसांच्या समन्वयाचे दर्शन
या सरावामध्ये पोलिसांच्या सर्वच विभागांनी एकमेकांशी संवाद साधून समोर उभ्या ठाकलेल्या प्रसंगाला तोंड दिले. जलद प्रतिक्रिया दलाचे कमांडो, वाहतूक शाखा व अन्य अधिकाऱ्यांनी तातडीने पावले उचलली. वाहतूक शाखेने वाहतुकीला दिशा दिली, तर पोलिसांनी बंदोबस्त व नाकाबंदीवर विशेष लक्ष दिले. या संपूर्ण कारवाईला लागलेल्या वेळेची नोंद व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दाखवलेली तत्परता पाहता सातारा पोलिस कोणत्याही संकटाला सामोरे जाण्यास तयार असल्याचा विश्‍वास नागरिकांना मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)