दस्त नोंदणीसाठी महिला वकिलांची ससेहोलपट

पिंपरी – महिला वकिलांना एखाद दुसऱ्या दस्त नोंदणीसाठी निबंधक कार्यालयात दिवसभर ताटकळत थांबावे लागत आहे. इतर शासकीय कार्यालयांमध्ये महिलांसाठी स्वतंत्र सुविधा असताना महिला वकिलांची मात्र ससोहोलपट होत आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीमध्ये सात दस्त नोंदणीचे सह दुय्यम निबंधक कार्यालय आहेत. त्यामुळे दस्त तयार करुन नोंदणीचे व इतर कायदेशीर कामे पक्षकाराच्या वतीने वकिलांमार्फत चालतात. यामध्ये महिला वकिलांची संख्या लक्षणीय आहे. वास्तविक पाहता महिला त्यांची उपजिविका व सक्षमीकरणासाठी सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नोंदणी कार्यालयात सहकारी पुरुष वकिलांप्रमाणे महिला वकील देखील पहाटे येऊन दस्त नंबरला लावतात. घरातील कामकाज, मुलांची शाळा, सणोत्सव अशी सगळी जबाबदारी सांभाळून त्या हे काम करतात. त्यांच्यासाठी ही तारेवरची कसरत ठरत आहे. महिला वकिलांचे एक किंवा दोनच दस्त असतात. त्यामुळे त्यांना एकाच दस्तासाठी संपुर्ण दिवस थांबावे लागते. थांबल्यानंतरही दस्त होईल की नाही, याची शाश्‍वती नसते. महिलांना गर्दीमध्ये धक्‍काबुक्‍की व स्वतःचा जीव मुठीत धरुन उभे रहावे लागते. त्यामुळे काही ठिकाणी विनयभंगाच्याही तक्रारी झाल्या आहेत. अशा वेळी शासकीय अधिकाऱ्यांकडूनही बघ्याची भूमिका घेतली जाते. महिला वकिलांसाठी स्वतंत्र दस्त नोंदणी कार्यालयाची मागणी पिंपरी-चिंचवड ऍडव्होकेट असोसिएशनच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

स्वतंत्र दस्त नोंदणी कार्यालयाची मागणी
वास्तविक पाहता महिलांना रेल्वे व इतर शासकीय कार्यालयात व गर्दीच्या ठिकाणी राखीव सोय करण्यात आली आहे. याच धर्तीवर महिला वकील, शासकीय प्राधिकृत अधिकारी व शासनाकडे एका दस्त नोंदणीसाठी नंबरमधून सवलत मिळावी. त्यांना एका दस्तासाठी प्राधान्य मिळावे. यासाठी सर्व दुय्यम निबंधक कार्यालयाला लेखी किंवा तोंडी आदेश द्यावेत. महिला वकिलांसाठी ठराविक वेळ ठेवावी अथवा स्वतंत्र दस्त नोंदणी कार्यालय राखीव ठेवावे, अशी मागणी महिला वकिलांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)