दस्त नोंदणीचे ‘सर्व्हर’ आठव्यांदा ‘डाऊन’

प्रशासनाला गांभीर्य आहे का? : पक्षकारांचे हाल सुरूच


कार्यालय पुण्यात, सर्व्हर मुंबईत, नियंत्रण मात्र दिल्लीतून

पुणे – जमीन आणि मालमत्ता खरेदी विक्रीच्या दृष्टीने डिसेंबर हा महत्त्वाचा महिना मानला जातो. नववर्षाच्या पार्श्‍वभूमीवर हे व्यवहार मोठ्या प्रमाणात केले जातात. मात्र, बुधवारी सकाळपासूनच राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा “सर्व्हर’ बुधवारी “डाऊन’ झाल्याने राज्यभरातील व्यवहार ठप्प झाले. असा प्रकार वर्षभरात सात-आठ वेळा झाला आहे.

राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे कार्यालय पुण्यात आहे. मात्र, याचा सर्व्हर मुंबईमध्ये आहे. “एनआयसी’ अर्थात “नॅशनल इन्फॉर्मेटिक्‍स सेंटर’कडे हे काम देण्यात आलेले आहे. मागील वर्षभरात वारंवार “सर्व्हर डाऊन’ किंवा “स्लो’ होण्याच्या घटना घडत आहे. सर्व्हर पूर्ववत करण्यासाठी “एनआयसी’कडे अधिकाऱ्यांना धाव घ्यावी लागते, मात्र याचे कार्यालय दिल्लीत आहे. यामुळे वेळेवर काम पूर्ण होत नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुण्यातील नोंदणी कार्यालयांमध्ये बुधवारी सकाळपासून नागरिकांची गर्दी झालेली होती. शहराच्या विविध भागांमधून तसेच ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर नागरिक आणि पक्षकार आलेले होते. मात्र, “सर्व्हर डाऊन’ असल्याने नागरिकांना ताटकळत बसावे लागले होते. यामुळे नागरिकांच्या रोषाला येथील कर्मचारी व अधिकाऱ्यांना सामोरे जावे लागत होते. तर, “सर्व्हर डाऊन’ होण्याची ही वर्षभरात सातवी ते आठवी वेळ आहे.

दुय्यम निबंधक कार्यालयातील सर्व्हर प्रणाली मागील दोन वर्षापासून संथ अथवा बंद असते. त्यामुळे नागरिकांचे काम करणाऱ्या वकिलांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात. हा विभाग शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळवून देणारा आहे. मात्र, सर्व्हर प्रणालीत कोणतीही सुधारणा करण्यात आली नाही. याप्रकरणी पुणे वकील संघटनेने दुय्यम निबंधक आणि “आयजीआर’ कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्याबाबत विचार करावा, असे पत्र पुणे जिल्हा वकील संघटनेला दिले आहे.
– अॅड. अमोल काजळेपाटील, उपाध्यक्ष, पुणे जिल्हा कनव्हिकसिंग प्रॅक्‍टिशनर्स असो.

बुधवारी नोंदणी झालेले दस्त : 0
बुधवारी जमा झालेला महसूल : 0
या महिन्यात नोंदणी झालेली दस्त : 1,55,270
या महिन्यात जमा झालेला महसूल : 1645.06 कोटी
या आर्थिक वर्षात नोंदणी केलेले दस्त : 16 लाख 54 हजार 52
या आर्थिक वर्षात जमा झालेला महसूल : 16008.56 कोटी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)