दवा और दुआँ ( अग्रलेख )

पुढारलेल्या देशात रुग्णांच्या अज्ञानाचा फायदा उचलू पाहणाऱ्यांना काबूत ठेवणारी यंत्रणा डोळ्यात तेल घालून असते. त्यातूनच बऱ्याच औषधांना तेथे पूर्वीपासून बंदीच होती. मात्र आपल्याकडे त्यांचे प्रिस्क्रिप्शन आणि सेवन अद्याप सुरूच होते. ते दवा म्हणून ज्यांनी कोणी घेतले असेल तर त्यांच्यासाठी दुआँ मागण्याची वेळ येईपर्यंत हा धंदा राजरोस सुरू 
होता. किमान यापुढे तरी याला पायबंद घातला जावा. 

मध्यंतरी सोशल मीडियावरची एक पोस्ट वाचनात आली. एक माणूस तपासणीसाठी डॉक्‍टरांकडे गेला. डॉक्‍टरांनी त्याला प्रिस्क्रीप्शन दिले. ती चिठ्ठी त्याच्या हातात देताना “दोन दिवस-तीन वेळा’ औषध घ्या, असे सांगितले.

सर्वसामान्य भारतीय असतात तसेच तो माणूस बिचारा भाबडा. त्याने डॉक्‍टरांनी सांगितल्याप्रमाणे केले व तिसऱ्या दिवशी पुन्हा डॉक्‍टरांना भेटायला गेला. डॉक्‍टरांनी गोळ्या संपल्या का विचारल्यावर “कोणत्या गोळ्या’ असा प्रतिप्रश्‍न त्यानेच डॉक्‍टरांना केला व तुम्ही सांगितल्या प्रमाणे “दोन दिवस तीन वेळा’ त्या चिठ्ठीचे तुकडे घेउन आपण बरे झालो, असे सांगत त्याने डॉक्‍टरांचे आभार मानले.

यातला विनोदाचा भाग सोडला तरी दोन गोष्टी यात आहेत. एक म्हणजे तुम्ही विश्‍वासाने कोणतीही गोष्ट केली तर कागदाचाही तुम्हाला गुण येतो; व दुसरी आपल्या देशात डॉक्‍टरांवर तेवढीच श्रध्दा आहे, जेवढी ईश्‍वरावर असते. किंबहुना ईश्‍वरापेक्षाही काकणभर जास्तच! तथापी, अशा या सुशिक्षित डॉक्‍टरांची श्रध्दा कोणावर असते यावर बिचाऱ्या रूग्णाचे भवितव्य अवलंबून असते. कारण डॉक्‍टरची श्रध्दा त्याच्या पेशावर आणि रुग्णांचे आरोग्य चांगले व्हावे, या सद्‌भावनेवर असेल तर प्रश्‍नच मिटतो.

मात्र त्याची श्रद्धा जर पैशावर असेल तर सगळेच “भगवान भरोसे’. हे सगळे उगाळायचे कारण म्हणजे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा ताजा निर्णय. मंत्रालयाने 328 औषधांच्या निर्मितीवर आणि विक्रीवर बंदी घातली आहे. ही औषधे रुग्णाला तात्कालीक फायद्याची कदाचित ठरू शकतात. मात्र त्यातून वेगळीच गुंतागुंत निर्माण होऊन, त्याच्या आरोग्यावर दूरगामी अनिष्ट परिणाम होऊ शकतो, असे यासंदर्भातील अहवालात समोर आले आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय योग्यच म्हणावा लागेल.

पण आता दुसरा प्रश्‍न उभा राहतो ते ही 328 औषधे इतकी वर्षे बाजारात विकली जात होती व रुग्ण त्याचे सेवनही करत होते. डॉक्‍टरही त्यांना ती औषधे लिहून देत होते, त्यामुळे कोणाच्या आरोग्यावर काही दुष्परिणाम झाले नसतील का? जर झाले असतील तर त्याची जबाबदारी कोणाची? बाजारात ते औषध येऊ देण्याची परवानगी देणाऱ्या यंत्रणेची व त्या अनुषंगाने सरकारची, ती औषधे लिहून देणाऱ्या डॉक्‍टरांची; की, हे सगळे डोळे झाकून विश्‍वास ठेवत स्वीकारणाऱ्या रूग्णांची? यात सगळ्यात शेवटी जो काही त्रास अथवा हानी होणार आहे ती रुग्णाचीच. मात्र त्याने दाद कोणाकडे मागायची? भारतात औषधे व त्यांचे सेवन व त्याची उपलब्धता याबाबत एकुणच सगळा सावळा गोंधळ आहे.

काही आजार असे असतात की ऋतुमानाप्रमाणे ते हजेरी लावतात. लोकांनाही त्यांच्यावरच्या उताऱ्याची माहिती झालेली असते. त्यामुळे डॉक्‍टरांचा सल्ला न घेताच परस्पर ती विकत घेतली जातात व दिलीही जातात. आता तर गर्भपाताच्या गोळ्याही ऑनलाईन सर्रास उपलब्ध होत आहेत; व त्याचे मार्केट अत्यंत तेजीत आले असल्याच्या बातम्या वरचेवर येत आहेत. ही औषधे घेणारी अथवा घ्यायला लावणारी मंडळी व त्यांचा वयोगट पाहता त्यांना संभाव्य धोके आणि जिवाशी आपण काय खेळ खेळतोय व त्याच्या काय गंभीर परिणामांना भविष्यात सामोरे जावे लागू शकते, याची मुळीच कल्पना नसणार. बरे डॉक्‍टरही माणसेच असतात.

बाजारात कोणत्या विशिष्ट आजारावर नवे औषध आले असेल तर त्याला वरच्या यंत्रणेने परवानगी दिली असल्याचे गृहीत धरूनच ते त्याप्रमाणे त्या औषधाच्या सेवनाचा सल्ला देत असतात. दुसरा मुद्दा असा की, एकदा औषध बाजारात आणले की निर्मातेही त्यांचे प्रॉडक्‍ट खपवण्यासाठी कमी प्रयत्नशील नसतात. डॉक्‍टरांना व त्या अगोदर त्यांच्या औषधाला परवानगी देणाऱ्या यंत्रणेला प्रभावित करण्यासाठी तऱ्हेतऱ्हेचे हातखंडे ही मंडळी वापरतच असतात. त्यात कोणा एका व्यक्तीचा अथवा व्यक्तीसमुहाचा आर्थिक आणि तात्कालीक स्वरूपाचा लाभ होतो. पण एकदा त्यांची चेन सेट झाली की बाजार भरतो. बरेच डॉक्‍टर गरज नसलेली औषधेही मग लिहून देण्यास सुरूवात करतात. भाबडा रूग्ण हा त्यांचा बावळट ग्राहक केव्हा बनतो, ते त्या बिचाऱ्याला कधीच कळत नाही.

दोन किंवा अधिक प्रकारची औषधे एका विशिष्ट प्रमाणात एकत्र करून तयार केलेल्या औषधाला “फिक्‍स्ड डोस कॉम्बीनेशन’ अर्थात एफडीसी म्हणतात, असे सांगितले जातेय. आता बंदी घातलेली 328 औषधे याच वर्गवारीतील आहेत. रूग्णाच्या आरोग्याच्या नुकसानापेक्षा अन्य कोणते नुकसान असूच शकत नाही. ही औषधे त्यांच्यासाठी घातकच असल्याचे आता मंत्रालयाने सांगणे, म्हणजे एखाद्याला वेष्टनात सजवून विष खाऊ घालायचे व तू आता लवकरच मरणार आहे, असे सांगत, त्याचे हितचिंतक असल्याचा आव आणण्यासारखे आहे.

एखाद्या औषधाच्या दुष्परिणामामुळे आयुष्यातून उठलेली माणसे आजुबाजुला दिसतात. मात्र न केलेल्या पापाचे आणि दुसऱ्या कोणाच्या लोभाचे हे फलित आहे, याची त्या बिचाऱ्यांना कल्पनाही नसते. पुढारलेल्या देशात त्यामुळेच रूग्णाच्या अज्ञानाचा फायदा उचलू पाहणाऱ्यांना काबूत ठेवणारी यंत्रणा डोळ्यात तेल घालून असते. त्यातूनच बऱ्याच औषधांना तेथे पूर्वीपासून बंदीच होती. मात्र आपल्याकडे त्यांचे प्रिस्क्रिप्शन आणि सेवन अद्याप सुरूच होते. ते दवा म्हणून ज्यांनी कोणी घेतले असेल तर त्यांच्यासाठी दुआँ मागण्याची वेळ येईपर्यंत हा धंदा राजरोस सुरू होता. किमान यापुढे तरी याला पायबंद घातला जावा.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)