दलालांच्या गोरखधंद्याला बसणार टाळे !

प्रांतकार्यालय देणार मोफत जातप्रमाणपत्र : विद्यार्थ्यांना दिलासा
नगर – जातप्रमाणपत्र काढण्यासाठी विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. नागरिकांच्या अप्लशिक्षितपणाचा फायदा कार्यालयाच्या बाहेरील दलाल उठवित स्वत:चे उखळ पांढरे करत असतात. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच जात प्रमाणपत्रासाठी घालावे लागणारे हेलपाटे टाळावेत व त्यांच्या वेळ, पैशाची बचत व्हावी, यासाठी नगर प्रांत कार्यालयाकडून अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील नागरिकांना मोफत जात प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या अभियानामुळे दलालांच्या गोरखधंद्याला टाळे बसणार असून, नगर प्रांत कार्यालयाकडून राबविल्या जाणाऱ्या या अभियानाबद्दल विद्यार्थी वर्गाकडून समाधान व्यक्‍त होत आहे.
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली नगर-नेवासा उपविभागीय अधिकारी यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबविले जाणार आहे. अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना मोफत जातप्रमाणपत्र देणार आहे. यासाठी नागरिकांना जातीचा दाखला, मुलाचा शाळा सोडल्याचा दाखला, वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला, आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला, तलाठी रहिवासी दाखला, रेशन कार्ड, आधार कार्ड ही कागदपत्रे नगर येथील उपविभागीय कार्यालयात जमा करावीत. असे आवाहन प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी केले आहे. यासाठी लवकरच शिबीरही घेतले जाणार आहे. या जातप्रमाणपत्राचे वाटप मंडलस्तरावर केले जाणार आहे. जातप्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज केल्यावर कागदपत्रांमध्ये बोगस त्रुटी दाखवून सर्वसामान्य माणसाची फसवणूक होते. प्रांताधिकारी गाडेकर यांच्या या अभियानामुळे एंजटगिरीला चाप बसणार आहे.
जात प्रमाणपत्रासाठी पैसे भरुनही कित्येक दिवस प्रमाणपत्र मिळत नसल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात येते. ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना पैसे सरकवूनही जात पडताळणी कार्यालयाचे पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत. विद्यार्थ्यांना ताटकळत बसत असल्याचे पाहावयाला मिळत आहे. परंतु, इतरांपेक्षा अधिक पैसे सरकविणाऱ्यांना दाखल्यासाठी जास्त आटापिटा करावा लागत नसल्याचे वास्तवही या निमित्त समोर येत आहे. कार्यालयाच्या बाहेर स्वत:चे उखळ पांढरे करण्यासाठी दलालांची टोळी कायमच सक्रिय असते.
जातप्रमाणपत्र काढण्यासाठी विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी नगर प्रांत कार्यालयाकडून अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांनी कागदपत्रांची पूर्तता केल्यावर त्यांना जातप्रमाणपत्र मोफत दिले जाणार आहे. यासाठी लवकरच शिबीरही घेतले जाणार आहे. तरी जास्तीत-जास्त नागरिकांनी उपविभागीय कार्यालयात आपले कागदपत्रे जमा करावीत, असे आवाहन प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)