दर वाढीमुळे दुग्ध व्यवसायाला झळाळी

आठवडे बाजार फुलले, जनावरांच्या किंमती लाखांच्या घरात
बारामती  – बारामती तालुक्‍यात पावसाचे अत्यल्प प्रमाण आहे. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न शेतकऱ्यांना भेडसवत आहे. पशुधन अडचणीत असल्याने तालुक्‍यातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी जनावरे विकणे पसंद केले आहे. असे असले तरी दूध दरवाढीमुळे जनावरे खरेदीसाठी राज्यातील काही भागातून शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी बारामती बाजारात हजेरी लावली. त्यामुळे जनावरांना मागणी वाढल्याने जनावरांच्या किंमती देखील वाढल्या आहेत. चांगल्या जातींच्या गायी लाखांच्या घरात गेल्या. त्यामुळे शेतकऱ्यांना देखील फायदा झाला.
सध्या दूधाचे दर वाढल्याने दुग्ध व्यवसायाला झळाळी आली आहे. आधुनिक व्यवस्थापनाव्दारे दुग्ध व्यावसाय करणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. बारामतीच्या जनावरे बाजारात याची प्रचिती आली. पुणे, सातारा, नगर तसेच सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आणि व्यापरी बारामतीच्या जनावरे बाजारात खरेदी-विक्रीसाठी आले होते. त्यामध्ये केवळ पारंपारिक पध्दतीने दुग्ध व्यावसाय करणाऱ्या शेतकऱ्यांबरोबरच आधुनिक पध्दतीने दुग्ध व्यवसाय करणाऱ्या ग्राहकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात होती. यामध्ये शिक्षित तरुणाचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणवर होते. बारामती तसेच आसपासच्या तालुक्‍यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न भेडसवत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात जनावरे विक्रीसाठी आणली होती. मागणी जास्त असल्याने जनावरांची संख्या जास्त आसताना देखील जनावरांना चांगले भाव मिळाले. त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा झाला. इतर जिल्ह्यातील शेतकरी तसेच व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात जनावरांची खरेदी केली. त्यामुळे बाजार समितीच्या जनावरे बाजारात लाखोंची उलाढाल झाली. जवळपास चारशे जनावरांची विक्री झाली. त्यामध्ये गायी, म्हैशींचाही समावेश आहे.

बारामतीच्या जनावरे बाजाराची पहाणी
बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने दुग्ध व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाते. या व्यावसायाचे प्रशिक्षण घेणाऱ्या विदर्भ, मराठवाडा तसेच खानदेशातील प्रशिक्षणार्थी शेतकऱ्यांनी बारामतीच्या जनावरे बाजाराची पहाणी केली. वेगवेगळया जातींच्या गायी, त्यांचे संगोपन तसेच व्यवस्थापनाचे धडे त्यांनी प्रत्यक्षात गिरवले. केव्हीकेचे डॉ. आर. एस. जाधव यांनी याबाबत मार्गदर्शन केले.

बारामती बाजर समिती मार्फत जळोची उपबाजार येथे जनावरे बाजार भरविला जातो. पुणे जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील शेतकरी या बाजारात जनावरे खरेदी तसेच विक्रीसाठी येतात. बाजार समितीच्या वतीने त्यांना सुविधा पुरवल्या जातात. साडेतिनशे ते चारशे जनावरांची विक्री होते. यातून 40 ते 45 हजारांचे उत्पन्न बाजार समितीला मिळते.
– राजेंद्र बोरकर, संचालक, बारामती बाजार समिती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)