दरोड्याच्या तयारीत असलेले दोन जण जेरबंद

  • पडवी घाटाजवळ 2 गावठी कट्ट्रांसह 20 काडतुसे जप्त ः तीन जण फरार

यवत – शिरूर-सातारा मार्गावर पडवी (ता. दौंड) गावच्या हद्दीतील घाटाजवळ मंगळवारी (दि. 2) रात्री साडेआठच्या सुमारास दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीतील दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले असून, अंधाराचा फायदा घेत तीन जण फरार झाले आहेत. यावेळी पकडलेल्या दोघांकडून 2 गावठी कट्टे आणि 20 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
याबाबतची माहिती अशी की, यवत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक देवकर हे आपल्या पोलीस पथकासह गस्त घालीत होते. यावेळी राज्य मार्गावर दरोड्याच्या तयारीत असलेली पाच आरोपींची टोळी दबा धरून बसली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस पथक त्या ठिकाणी गेले असता पाच आरोपीपैकी तीन जण दुचाकीवरून पळून जाण्यात यशस्वी झाले, तर अंधाराचा फायदा घेत दोन दुचाकी सोडून पळून जात असताना जीव धोक्‍यात घालून पोलीस नाईक गणेश पोटे आणि विनोद रासकर यांनी दोन आरोपींना पाठलाग करीत जेरबंद केले आहे. यावेळी झालेल्या झटापटीत हे दोन पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र, या दोन आरोपींकडे 2 गावठी कट्टे, 20 जिवंत काडतुसे, एक लाकडी दांडके, लोखंडी टॉमी, मिरची पूड पोलिसांनी हस्तगत केली आहे.
सुरेश बापूराव खोमणे (वय 35, रा. कोऱ्हाळे, ता. बारामती) आणि अमोल विलास खरात (वय 24, रा. दहिवडी, ता. माण, जि. सातारा) असे दरोड्याच्या तयारीत असलेल्या जेरबंद केलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील आरोपी सुरेश खोमणे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर सातारा जिल्ह्यातील फलटण, म्हसवड, वडूज, पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, जेजुरी, तसेच मध्यप्रदेश राज्यातील खरगपूरसह दहा गुन्ह्यांपेक्षा अधिक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती यवत पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांनी दिली. यवत पोलिसांनी या दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या कामगिरीत पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक देवकर, पोलीस उपनिरीक्षक राहुल यादव, पोलीस नाईक संदीप कदम आणि इतर अशा पोलीस पथकाने भाग घेतला. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक देवकर करीत आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)