दरोड्याच्या तयारीत असणारी टोळी जेरबंद

सराईत गुन्हेगाराचा समावेश; तलवारी आणि चटणीपूड जप्त

सातारा – दरोड्याच्या तयारीत असलेल्या चौघांच्या टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. अशाच प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये हद्दपार असलेला टोळीप्रमुख अविनाश दडसचा अटकेत असलेल्या चौघांमध्ये समावेश आहे. या टोळीतील पाचवा संशयित पळून गेला.

अविनाश विलास दडस (वय 23, रा. आरफळ, ता. सातारा), सागर रोहिदास जाधव (वय 26), अविनाश रोहिदास जाधव (वय 24, दोघेही रा. हिंगणदरा, आदर्की खुर्द. ता. फलटण) व शहाजी उर्फ सोनु शंकर शिंदे (वय 23, रा. निंबाळकरवस्ती, आदर्की खुर्द) अशी अटकेत असलेल्या संशयितांची नावे आहेत. शुभम धर्माजी निंबाळकर (रा. आदर्की खुर्द) हा त्यांचा पाचवा साथीदार पोलिसांना पाहून पळून गेला.

सातारा तालुक्‍यातील आरफळचा अविनाश दडस हा मालमत्ताविषयक विविध गुन्ह्यांमध्ये सहभाग असलेला सराईत गुन्हेगार आहे. त्यावर दोन वर्षांसाठी सातारा जिल्ह्यातून तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. तरीही त्याचा इतर चार साथीदारांसह जिल्ह्यात वावर असल्याची पोलिसांकडे माहिती होती. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक पद्‌माकर घनवट यांनी सहायक पोलिस निरीक्षक विकास जाधव यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करुन दडसला जेरबंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

पोलिस पथक दडसच्या मागावर होते. फलटण येथील बिबी गावच्या हददीत पॉवर हाऊसजवळ दरोडा घालण्याच्या तयारीने दडससह पाच जण एकत्र आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला. त्यावेळी त्यातील पाचवा संशयित मोटारसायकलवरुन पसार झाला. दडस व त्याचे तिन साथीदार पोलिसांच्या हाती लागले. दडसकडे 25 इंच लांबीची तलवार तसेच प्लॅस्टिक पिशवीत मिरची पूड मिळून आली. या संशयितांकडून जबरी चोरी, दरोडा, घरफोडी असे गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तवली आहे.

या कारवाईत स.पो.नि. विकास जाधव यांच्यासह सहायक फौजदार सुरेंद्र पानसांडे, मोहन घोरपडे, हवालदार उत्तम दबडे, नितीन गोगावले, संतोष पवार, प्रमोद सावंत, निलेश काटकर, रवींद्र वाघमारे, मोहसीन मोमीन, मयुर देशमुख, विजय सावंत यांनी सहभाग घेतला.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)