मोक्का न्यायालयाचा आदेश : 1 लाख 10 हजारांचे साहित्य लांबवले

पुणे – दगडफेक करून कार आडवून दरोडा टाकल्याप्रकरणात टोळीप्रमुखाला मोक्का न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्याला 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. मोक्का विशेष न्यायाधीश ए. एस. महात्मे यांनी हा आदेश दिला आहे.
अमर ऊर्फ अमऱ्या रज्या भोसले (23, रा. शेलगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) असे पोलीस कोठडी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणात इरण्या अफरिशा भोसले, रवी बशीर पवार आणि अभिजित अफरिशा भोसले या तिघांवर गुन्हे दाखल आहेत. हे तिघे अद्याप फरार आहेत. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील करमाळा टेंभूर्णी रस्त्यावर पांगरे गावच्या हद्दीत घडली. 26 जानेवारी रोजी रात्री दहाच्या सुमारास टाकण्यात आलेल्या दरोड्यात 1 लाख 10 हजार रुपयांचे साहित्य लांबविण्यात आले होते. याबाबत अशोक दत्तात्रय कदम (वय 47, रा. सौंदे, ता. करमाळा, जि.सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी, त्यांची पत्नी अश्‍विनी आणि मेव्हणा समाधान गायकवाड हडपसर येथून स्विफ्ट कारने देवकाऱ्यासाठी सौंदे येथे गेले होते. देवकार्य उरकल्यानंतर रात्री मेव्हणे गायकवाड यांच्या घरी जेवण्यासाठी चालले होते. त्यावेळी गाडीवर दगड टाकण्यात आला. बाहेर येऊन पाहिले असता चौघांनी मारहाण आणि शिवीगाळ करून जबरी चोरी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात अमर याला मोक्का कायद्यानुसार न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी अमर हा सराईत गुन्हेगार आहे. त्याने मागील चार वर्षांपासून टोळी निर्माण करून करमाळा भागात गंभीर गुन्हे केले आहेत. त्याचे तीन साथीदार फरार असून, त्यांच्या शोधासाठी, त्यांनी अशा प्रकारचे आणखी गुन्हे केले आहेत का, गुन्ह्यात मिळालेल्या मालमत्तेच्या शोधासाठी, त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी विशेष सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी विजय कबाडे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)