दरेकरवाडीत अतिक्रमण करून शेतकऱ्यास मारहाण

सहा अनोळखींवर गुन्हा दाखल

शिक्रापूर – दरेकरवाडी (ता. शिरूर) येथे एका शेतकऱ्याच्या जमिनीमध्ये कंपाऊंड केलेले असताना देखील अनोळखी पाच ते सहा जणांच्या जमावाने दोन कारमधून येऊन अतिक्रमण करून बोर्ड लावून जमीन मालकास शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केली. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात अनोळखी पाच ते सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुल गंगाराम गवारी (रा. विठ्ठलवाडी ता. शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राहुल गवारी यांच्या पत्नीच्या नावे शेतजमीन असून त्या जमिनीची वहिवाट गवारी हे करतात, त्या जमिनीला गवारी यांनी तारेचे कंपाऊंड केलेले असून शिरूर न्यायालयाची मनाई ऑर्डर घेतलेली आहे. शुक्रवारी (दि. 22) गवारी हे त्यांच्या शेतात गेलेले असताना त्यांना त्या ठिकाणी दोन कार (एमएच 12 डब्ल्यू 9004, एमएच 12 एम डब्ल्यू 8788) आल्या व त्यामधून पाच ते सहा अनोळखी व्यक्‍ती उतरले. त्यांनी गवारी यांच्या जमिनीचे कंपाऊंड तोडून आतमध्ये प्रवेश करून लोखंडी बोर्ड लावून स्वतः उभे राहत फोटो काढत असल्याचे दिसले, त्यावेळी गवारी यांनी बोर्ड पाहिला असता त्यांना त्यावर ही जमीन गणेश खराबे यांच्या मालकीची असून या जागेवर अतिक्रमण केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असा मजकूर लिहिलेला दिसून आला. त्यावेळी गवारी यांनी या व्यक्‍तींना तुम्ही येथे काही करू नका, आमच्याकडे चतुर्सिमा आहे असे सांगितले असता, त्यातील एकाने गवारी यांना मारहाण करून दमदाटी केली तसेच हातपाय तोडून टाकण्याची आधी धमकी देऊन गवारी यांचा मोबाईल काढून घेण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादित नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवशांत खोसे व तेजस रासकर करीत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)