दरारा नव्हे, आधार देणार : आर.के. पद्‌मनाभन पोलीस आयुक्‍त, पिंपरी-चिंचवड

शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याकरता यासाठी पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्‍तालयाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे पूर्वी जी परिस्थिती होती त्यामध्ये सुधारणा करीत शहर सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस आयुक्‍तालय कटिबद्ध आहे. त्यामुळे शहरात पोलिसांची दरारा नाही तर आधार कसा निर्माण होईल, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. शहर विकासाच्या दिशेने झपाट्याने वाढत असल्यामुळे शहरातील लोकसंख्या, त्यांच्या मागण्या या दिवसेंदिवस बदलत आहेत. त्यानुसार आयुक्‍तालयदेखील नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर राहण्यासाठी अद्ययावत होत आहे.

गुन्हे हे दोन प्रकारचे असतात त्यात काही गुन्हे हे पूर्णपणे पोलिसांनी सोडवणे अपेक्षित असते. मात्र, काही गुन्हे हे असे असतात की त्यामध्ये नागरिकांनीही मदत करणे किंवा वेळीच निर्बंध घालून गुन्हा थांबणे अपेक्षित असते. उदाहरणार्थ, वाहतूक नियमांचे पालन करणे. कारण शहरात वाहतूक सुरळीत ठेवणे ही केवळ पोलिसांची जबाबदारी नाही तर ती सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. ही भावना वाढवण्यासाठी आम्ही सध्या प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी तक्रारपेटी, फोन -अ -फ्रेंड असे अनेक उपक्रम आम्ही राबवत आहोत. तसेच अदखलपात्र गुन्ह्याची दखलसुद्धा आम्ही घेत आहोत. कारण या छोट्या तक्रारी वेळीच रोखल्या तर पुढील मोठे गुन्हे रोखता येणे शक्‍य आहे. शहरात ज्या गुन्हेगारी टोळ्या आहेत त्यावर देखील आमची नजर आहे. गुन्हा काय व त्याची पार्श्‍वभूमी जाणून घेतली तर त्यावर तोडगा काढणे सोपे जाते. यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी तक्रारी सोडवणे हे केवळ सरकारी काम आहे, असे न समजता त्याबद्दल संवेदनशील होणेदेखील गरजेचे आहे. आम्ही सुरुवातीला पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये ही भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहोत. कारण सामान्य नागरिकाला त्याच्याकडे येताना कोणतीही भीती वाटायला नको. मी स्वतः त्यांच्या तक्रारी ऐकून घेतो कारण नागरिकांना आपले कोणी तरी ऐकून घेत आहे हा आधारदेखील खूप मोठा असतो. यामध्ये केवळ सामान्य नागरिकच नाही तर उद्योजक, विद्यार्थी असा साऱ्यांचा समावेश आहे.
नागरिकांना काय हवं आहे यासाठी त्यांच्याशी संपर्कात राहणे गरजेचे असते. त्यासाठी सार्वजनिक ठिकाणी पोलीस हजर असणे, एका फोनवर पोलीस येणे, तक्रार देण्यासाठी नागरिक पोलीस ठाण्यापर्यंत नाही तर पोलीस नागरिकांपर्यंत जाणे हे आमचे ध्येय आहे. अर्थात, नवीन पोलीस आयुक्‍तालय असल्यामुळे नागरिकांच्या अपेक्षा या उंचावल्या आहेत. त्या 100 टक्‍के पूर्ण करणे शक्‍य नाही. तसेच बदल हा एका दिवसात होत नसतो. त्यासाठी हळूहळू अगदी ग्रास रुट लेवलपासून सुधारणा होणे गरजेचे आहे. यात अगदी पोलीस कर्मचाऱ्यांमधील शिस्तदेखील समाविष्ट आहे. मी अधिकारी असलो तरी मी नागरिकांचा सेवक आहे, याची जाणीव झाली तरच ते योग्य कर्तव्य बजावू शकतील. यासाठी वेळप्रसंगी अधिकारांचा गैरवापर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची कारवाईसुद्धा आयुक्‍तालय करत आहे. कारण न्यायदेवतेजवळ गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो. यातून नागरिकांपर्यंतही चांगला संदेश जातो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रथम आयुक्‍त; पण अनुभव जुना!
नवीन आयुक्‍तालयात अनेक संकल्पना आणि उपक्रम पहिल्यांदा दिसणार आहेत. अदृश्‍य पोलिसिंग ही संकल्पना राबवणार आहे. पोलीस फक्‍त दिसले तरी गुन्हेगारी कमी होऊ शकते. यामुळे पोलिसिंग आणि गस्त वाढवणार. मोक्‍का, एमपीडीए यासारख्या कारवाया करण्यावर भर असणार आहे. जलद प्रतिसादासाठी क्‍विक रिस्पॉन्स टीम कार्यान्वित करणार आहे. असे अनेक उपक्रम असून बोलून दाखवण्यापेक्षा आगामी काळात नागरिकांच्या प्रत्यक्ष अनुभवास येणार आहे. मी व इतर वरिष्ठ अधिकारीदेखील वैयक्‍तिक पातळीवर याची दखल घेत आहोत. आयुक्‍त पहिलाच असलो तरी अनुभव जुना आहे. शहरात पहिला आयुक्‍त म्हणून काम करत असताना नक्‍कीच जबाबदारी मोठी आहे. कारण आता बसवलेली घडी इथून पुढे कायमस्वरूपी असणार आहे.

कोटेशन
शहराचा अभ्यास आणि माहिती घेऊन नियोजनपूर्वक काम करणार आहे. कायदा सुव्यवस्था आणि नागरी सुरक्षा नेहमीच सर्वोच्च स्थानी असणार आहे. सुरुवातीला काही अडचणी आणि समस्या निर्माण होणे स्वाभाविक आहे. मात्र, त्याचा विचार न करता आहे त्या परिस्थितीत काम सुरू केले आहे. नागरिकांना पोलिसांची भीती न वाटता आदर आणि आधार वाटावा याच दृष्टीने सकारात्मक प्रयत्न करण्यावर भर असणार आहे. पोलीस म्हणजे केवळ संघर्ष व नकारात्मकता नाही. हे आयुक्‍तालय बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित असे आयुक्‍तालय आहे. त्यामुळे त्याची घडी नीट बसवणे ही माझी जबाबदारी आहे. त्यामुळे केवळ घोषणा न करता कामाचा ऍक्‍शन प्लॅन तयार आहे. मात्र, “ऍक्‍शन स्पिक्‍स लाऊडर दॅन वर्डस्‌’ या तत्त्वानुसार बोलून नाही तर करून दाखवणार.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)