दरवर्षी 30 हजार अतिक्रमणांचा भार

महापालिकेने काढलेल्या आकडेवारीमधून बाब समोर

– सुनील राऊत

-Ads-

पुणे : देशातील राहण्यायोग्य शहर म्हणून निवड झालेल्या पुणे शहरातील रस्त्यावर वर्षाला सरासरी 30 हजार अतिक्रमणे होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे ही अतिक्रमणे महापालिकेने काढलेल्या आकडेवारीनुसार आहेत. त्यामुळे राजकीय हास्तक्षेप, पालिकेच्या अतिक्रमण विभागाशी असलेले लागेबांधे यांची संख्या गृहीत धरल्यास हा आकडा 40 हजाराच्या वर जाईल. या अतिक्रमनांनी पदपथ आणि रस्ते अडविले असून त्यामुळे शहरातील वाहतूक समस्येने गंभीर रूप धारण केले आहे.

2016-17 या आर्थिक वर्षात महापालिकेने केलेल्या कारवाईत सुमारे 23 हजार 501 अतिक्रमणे काढली असून 2017-18 मध्ये 31 हजार 242 तर, एप्रिल 2018 ते सप्टेंबर 2018 या अवघ्या सहा महिन्यांत 18 हजार 690 अतिक्रमनांवर कारवाई केली आहे.

नो हॉकर्स झोन वाऱ्यावर
महापालिकेकडून शहरातील वाहनांची गर्दी, बाजारपेठा आणि वाहतुकीची समस्या लक्षात घेऊन शहरातील प्रमुख 45 चौक आणि 143 रस्ते “नो हॉकर्स झोन’ म्हणून दहा वर्षांपूर्वी घोषित केले आहेत. मात्र, झोन केवळ कागदावरच असून या ठिकाणी वारंवार अतिक्रमण होताना दिसतात. त्यात प्रामुख्याने हातगाडी आणि पथारीची संख्या सर्वाधिक आहे. दरवर्षी जवळपास प्रत्येकी दहा हजार पथारी आणि हातगाड्या या भागातून जप्त केल्या जातात. पालिकेकडून संपूर्ण वर्षभर याच ठिकाणी कारवाई करून ही अतिक्रमणे काढली जातात. या शिवाय, शहरात उपनगरातही मोठ्या प्रमाणात अतिक्रमने होतानाचे चित्र आहे. मात्र, अपुरे प्रशासकीय मनुष्यबळ, कारवाईत वारंवार होणारा राजकीय हस्तक्षेप यामुळे पालिकेकडून ही करण्यात आलेली कारवाई केवळ 50 टक्केच असून पालिकेच्या कारवाईपासून कितीतरी अतिक्रमणे दूरच असल्याचे चित्र आहे.

भरमसाठ दंड तरीही अतिक्रमणे
महापालिकेने शहरात होणारी ही अतिक्रमणे काढल्यानंतर जप्त केलेले साहित्य सोडण्यासाठी या वर्षांपासून 5 ते 10 हजार रुपयांच्या दंडाची तरतूद केली आहे. या पूर्वी पथारी, हातगाडी तसेच स्टॉलसाठी अवघा 500 रुपये दंड आकाराला जात होता. हा दंड आता हातगाडी आणि स्टॉलसाठी प्रत्येकी 10 हजार तर, पथारीसाठी 5 हजाराचा आकाराला जातो. त्यानंतरही शहरातील ही पथारी, स्टॉल आणि हातगाडीचे अतिक्रमण थांबण्यास तयार नाहीत. त्यामागे पालिकेच्याच कर्मचाऱ्यांचा हातभार असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. महापालिकेकडून जप्त केलेलं साहित्य त्याच्याकडील गोडावूनमध्ये ठेवले जाते. हे साहित्य नंतर चोरून अथवा रात्रीच्या अंधारात पुन्हा संबंधितांना चिरीमिरी घेऊन गुपचूप परत दिले जाते. त्यामुळे महापालिकेने रोखण्यासाठी भरमसाठ दंड ठेवला असला तरी त्याचा काहीच परिणाम होत नसल्याचे वास्तव आहे.

ही आहेत प्रमुख अतिक्रमणे
स्टॉल, हातगाडी, पथारी, सिलेंडर, शेड, मांडव, धार्मिक स्थळे, इतर, व्यावसायिक वाहने, रस्त्यावरील बेवारस वाहने ही अतिक्रमणे शहरात प्रामुख्याने दिसून येतात.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)