दरवर्षी खड्डा तोच पण झाडे वेगळी

वनविभागातील अधिकाऱ्यांचा पर्यावरण मंत्र्यांचा घरचा आहेर
पुणे, दि. 19 (प्रतिनिधी) – दरवर्षी पावसाळा आला की वृक्षारोपण कार्यक्रमात मंत्री, आमदार, खासदार झाडे लावतात, फोटो काढून प्रसिद्धी मिळवितात. मात्र, लावलेले झाड जगवण्याकडे कोणीच लक्ष देत नाही. त्यामुळे पुन्हा दुसऱ्या वर्षी वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात खड्डा तोच असतो फक्त झाडे वेगळी असतात, अशा शब्दांत राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी अप्रत्यक्षरित्या वनमंत्र्यांना घरचा आहेर दिला आहे.
राज्याच्या पर्यावरण विभाग आणि प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे आयोजित “पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी’ या आळंदी ते पंढरपूर पायी वारीचा शुभारंभ सोहळा कदम यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर मुक्ता टिळक, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रभारी सचिव डॉ.अमर सुपाते, प्रादेशिक अधिकारी जगन्नाथ साळुंखे, वनराईचे अध्यक्ष रविंद्र धारिया, दींडीचे मार्गदर्शक डॉ.प्रकाश खांडगे, शैला खांडगे, संयोजक संजय भुस्कुटे, किर्तनकार ज्ञानेश्वर महाराज वाबळे, चंदाबाई तिवारी आदी उपस्थित उपस्थित होते. यावेळी विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण करण्यात आले तसेच “आपलं पर्यावरण’ या मासिकाचे प्रकाशनही करण्यात आले.
कदम म्हणाले, पावसाळा आला की वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला जातो. वनमंत्री कोटीच्या संख्येत वृक्षलागवडीची घोषणा करतात. त्यानुसार मंत्री, आमदार, नगरसेवक, लोकप्रतिनिधि वृक्षारोपण करुन दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात फोटो छापून आणतात. मात्र, लावलेल्या झाड जगविण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे होते. त्यामुळे दुसऱ्या वर्षीही तोच कार्यक्रम घेतात. मात्र, खड्डा तोच असतो, फक्त झाड नवीन असते. वृक्षारोपणासंदर्भात अधिकारी हजारो झाडे लावल्याचे सांगतात, प्रत्यक्षात जागेवर एकही झाड जगलेले नसते. या झाडांची संख्या केवळ कागदांवरच असते. हा अनुभव मी स्वत: घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले.
सध्याच्या पर्यावरणाच्या स्थितीबाबत बोलताना ते म्हणाले, आज आपण विकासाकडे वाटचाल करत आहोत. शहरे वाढली त्यामुळे झाडे तुटली, शेती संपली आहे. दुष्काळ, गारपीट, अवेळी पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येत आहे. याला आपणच जबाबदार आहोत. पर्यावरणाचा समतोल राखणे ही काळाची गरज आहे. प्रत्येकाने किमान पाच झाडे लावून ती जगवली पाहिजेत. तरच आपले राज्य भविष्यात सुखी व समाधानी होईल. झाडे लावली आणि जगवली तर आपण शतायुषी होऊ.
टिळक म्हणाल्या, पर्यावरण दिंडी अभिनव अपक्रम आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने सहकार्य व मार्गदर्शन करावे.

भागवत आणि स्वामीनाथन हीच नावे आम्ही सुचवली आहेत
राष्ट्रपती पदाबाबत बोलण्याचा अधिकार पक्ष प्रमुखांना आहे, मला नाही. राष्ट्रपती पदासाठी आमच्या पक्षाकडून पहिले नाव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि दुसरे नाव हरितक्रांतीचे जनक डॉ.एम.एस.स्वामीनाथन यांचे दिले आहे. आपला देश कृषीप्रदान असून स्वामीनाथन यांचे कृषी क्षेत्रात मोठे योगदान आहे. त्या योगदानाचे प्रतिक म्हणून शेतकऱ्यांच्या एका प्रतिनिधीला राष्ट्रपतीपदावर बसविले जावे यासाठी डॉ.स्वामीनाथन यांचे नाव पुढे केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)