दररोज होते शंभर टक्के कचरा संकलन

कराड, दि. 26 (प्रतिनिधी) – स्वच्छ भारत मिशनच्या स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत कराड नगरपालिकेने शहरातून संकलित करण्यात येत असलेल्या कचर्‍याचे योग्य असे व्यवस्थापन केले आहे. शहरासह वाढीव भागातून दररोज शंभर टक्के कचरा संकलनावर भर दिला जात आहे. त्याचबरोबर घनकचर्‍याच्या व्यवस्थापनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याने पालिकेचा हा उपक्रम इतर नगरपालिकांना आदर्शवत असा ठरत आहे.
कराड नगरपालिकेने गतवर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत उज्ज्वल यश संपादन केले असले तरी ज्या गोष्टीमध्ये आपण कमी पडलो, याचा सारासार विचार करत व नव्या तंत्रज्ञानाची माहिती घेण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे दिसत आहे. स्वच्छ सर्वेक्षणात देशात प्रथम आलेल्या इंदौर शहराचा दौराही पालिकेला फायदेशीर ठरला आहे. तेथे ज्या पद्धतीने कचर्‍याचे व्यवस्थापन करण्यात आले आहे. याची माहिती घेवून त्यात आणखी काही बदल करता येईल का याचाही प्रयत्न कराड नगरपालिकेने केला आहे.
आरोग्य सभापती प्रियांका यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रिनी टीमकडून दररोज सर्वेक्षणाचे काम सुरु आहे. ओला व सुका कचरा याची माहिती नागरिकांना दिली जाते. तसेच कचरा साठविण्यासाठी बकेटचा वाटप करण्यात येत आहे. शहरात ठिकठिकाणी असणार्‍या कचराकुंड्या उचलून तेथे स्वच्छ सुंदर कराड नगरपालिकेचे बोर्ड लावण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक दिवस पडून राहणार्‍या कचर्‍यामुळे शहरात दुर्गंधी पसरत होती ते बंद झाली आहे. येथील गुरुवार पेठेतील मुख्य भाजीमंडईत सकाळी व सायंकाळी अशा दोनच वेळेत कचरा कुंडी ठेवली जाते. तेथे सर्वात जास्त कचर्‍याचे प्रमाण होत असल्याने व्यावसायिकांच्या सोयीसाठी पालिकेने ही व्यवस्था केली आहे. त्या व्यतिरिक्त इतर वेळेत भाजीमंडईत कचरा कुंड्या दिसत नाहीत.
शहरातील ठिकठिकाणच्या मोठ्या कचरा कुंड्या काढल्याने घरोघरी ओला कचरा साठू लागला. त्यामुळे घरालाच कचरा कुंडीचे स्वरुप प्राप्त होऊ लागल्याने यावर उपाय म्हणून पालिकेने कचर्‍याचे योग्य नियोजन व संकलन होण्यासाठी नवीन अठरा घंटागाड्या खरेदी केल्या आहेत. सध्या नवीन पंधरा व जुन्या घंटागाड्यांच्या माध्यमातून कचरा संकलन होत आहे. त्याचबरोबर ट्रॅक्टर, डंपर यासारखी वाहने पकडून 23 वाहनांमधून कचरा संकलनासाठी वापरली जात आहे. यातून दररोज 32 टन ओला व सुका कचरा संकलित केला जातो. तसेच नव्या घंटागाड्यामध्ये ओला व सुका असा वेगवेगळा कचरा संकलित होत असल्याने पुढील प्रक्रियाही सोपी होऊ लागली. दररोज सकाळी एकाचवेळी शहरात सर्वत्र कचरा संकलनाचे काम सुरु असते. नव्या घंटागाडांमध्ये जिंगल गीत लावण्यात येत असल्याने वातावरण निर्मिती होण्याबरोबरच नागरिकांनाही घंटागाड्यांच्या येण्याची सूचना मिळत आहे. संकलित झालेल्या घनकचर्‍यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्पही पालिकेने उभारला आहे. त्याची विस्तृत माहिती पुढील भागात पाहू.

 

चालता बोलता कचरा उचलणे स्पर्धा

शहरातील कचर्‍याचे जास्तीत-जास्त संकलन व्हावे. स्वच्छतेचे महत्त्व नागरिकांना पटावे, यासाठी कराड नगरपालिकेने चालता-बोलता कचरा उचला स्पर्धेचे आयोजन केले आहे. यामध्ये विजेत्यांना प्रोत्साहनपर बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)