दम्याच्या विकारासाठी ‘उष्ट्रासन’ 

उष्ट्र म्हणजे उंट आणि शरीराची उंटासमान अवस्था करायची म्हणजेच उष्ट्रासन होय. या आसनात उंटाप्रमाणे शरीर वाकडे आकार घेते. प्रथम वज्रासनाप्रमाणे गुडघ्यावर बसावे. गुडघे आणि पायांच्या चौड्यामध्ये थोडे अंतर ठेवावे. श्वास रोखून उजव्या हाताने उजव्या पायाची टाच आणि डाव्या हाताने डाव्या पायाची टाच घट्‌ट पकडावी हे करत असताना मान अपोआप खाली झुकेल आणि हात ताठ ठेवावेत. मान मागील बाजूस झुकवून दृष्टी जमिनीकडे झुकेल.
पोट जेवढे बाहेर काढता येईल तेवढे काढावे. शरीराला आपण कमरेतून दुमडून हे आसन करतो. या आसनाचा कालावधी सहा ते आठ सेकंद ठेवावा. दररोज जेवणानंतर हे आसन करणे फायद्याचे आहे. चार आवर्तने करावी. ज्यामुळे वात, कफ, पित्त समतोल रहातो आणि वात, कफ, पित्ताच्या रोगापासून मुक्तता होते. गाठीचे रोग होत नाही. स्त्रियांना विशेषत: त्यांच्या जननेंद्रीयांना व्यायाम मिळतो आणि स्त्रियांची जननेंद्रीय मजबूत होतात. 
 
या आसनाचे चौफेर फायदे होतात. एकदम हे आसन जमणार नाही, पण हळूहळू तज्ज्ञांच्या मदतीने हे आसन आदर्शवत करता येते. रक्तातील अशुद्धता दूर होते. रस, रक्त, मास, मेद, अस्थीमज्जा आणि शुक्र यांच्यातील दोष दूर करणारे उष्ट्रासन शरीर सशक्त बनवते. भगंदरसारख्या रोगात उष्ट्रासन केले असता तो रोग बरा होण्यास मदत होते. मान खांदे पाठदुखी कमी होते. मधुमेहींना हे आसन वरदान आहे. डोळ्यात जर पाणी येत असेल, डोळे खाजत असतील, आणि अंधूक दिसत असेल तर नियमितपणे केलेले उष्ट्रासन या तक्रारी दूर करते.
अतिरिक्त चरबी कमी करते. उष्ट्रासनात छातीलाही ताण बसतो. त्यामुळे छाती सृढ होते. छाती भरदार बनावी म्हणून पुरुषांनीही उष्ट्रासन नियमित करावे. गॅसेस कमी होतात आणि पचनशक्ती सुधारते. टॉन्सिल्सचा त्रास, अकारण घसा बसणे व आवाजाच्या तक्रारी दूर करते. उष्ट्रासन नियमित केल्यामुळे कंठग्रंथीचे कार्य सुधारते. स्वययंत्रालाही व्यायाम मिळतो. म्हणून गायक गायिका आणि निवेदक तसेच सतत डोळ्यांची कामे करणारे म्हणजे चष्मा दुरुस्ती, घड्याळ दुरुस्ती व सोन्याचे बारीक नक्षीकाम करणाऱ्यांनी उष्ट्रासन रोज करावे. उष्ट्रासनाने डोकेदुखी कमी होते. 
 
स्त्रियांना तर हे आसन वरदानच आहे. म्हणून किशोरींपासून वृद्धस्त्रीयांपर्यंत सर्वांनी उष्ट्रासन नियमित करावे. स्त्रीयांच्या विविध आजारांवर उष्ट्रासन नियमित करावे. धूपणीसारखा रोग बरा होतो. मासिकपाळीच्या तक्रारी दूर होतात. म्हणूनच स्त्रियांनी वारंवार होणाऱ्या धूपणीच्या रोगातून मुक्तता मिळवण्यासाठी उष्ट्रासनाचा नियमित सराव करावा. दररोज तीन ते चार वेळा हे आसन करावे. 
 
शक्‍यतो वज्रासन केल्यानंतर हे आसन करावे. सुरुवातीला हात गुडघ्याला किंवा टाचेला लागत नाही. पण हळूहळू प्रयत्न करावे. ज्यांना दमा असेल त्यांची छाती या आसनामुळे रुंदावते व श्‍वास घेणे सोपे जाते. पंधरा ते वीस सेकंद हे आसन टिकवता येते. या आसनाचे अनेक फायदे आहेत. नजरेची बारीक कामे करणाऱ्यांनीसुद्धा हे आसन नियमित करावे. पण योगतज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली कारण योगतज्ज्ञ पूर्व तयारीने हे आसन करुन घेतात. अचूकता साधता येते. नाहीतर पाय लचकण्याची गुडघा दुखण्याची, शरीराला झटका बसण्याची शक्‍यता असते. तेव्हा सावधान! 

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)