दमदार पावसानंतरही खेडमध्ये पाण्यासाठी पायपीट

  • दरवर्षीचीच परिस्थिती ः मागण्या, निवेदनांकडे राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष

पाईट – आज सर्वत्र जागतिक जलदिन साजरा होत असताना खेड तालुक्‍यात मात्र पाणी टंचाईची सुरुवात होऊ लागली आहे. खेड तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला; परंतु पाणी साठवण्याचे साठे फार कमी असल्याने दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. ग्रामस्थांनी मागण्या, निवेदने देऊनही शासन आणि प्रशासन अतिशय सुस्त असल्याने पश्‍चिम भागातील अगदी शेवटचे गाव असणाऱ्या तांबडेवाडी – विऱ्हाम येथील जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांवर कोणी पिण्याचे पाणी देता का पाणी! असे म्हणण्याची वेळ आली आहे.
या आदिवासी पाड्यातील महिलांना एक ते दीड किलोमीटर अंतरावरून उन्हातान्हातून पाणी आणावे लागत आहे. जीवनाचे दुसरे नाव पाणी पण स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतरही पिण्याचे सुद्धा पाणी मिळत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. तांबडेवाडी हा आदिवासी पाडा असून स्वातंत्र्यानंतर अजूनही अनेक जीवनावश्‍यक सुविधांपासून वंचित आहे. पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पिण्याचे पाणी अतिशय अशुद्ध व मातीमिश्रीत असून दुर्गंधीयुक्त असून येथील अबालवृद्धांना अनेक आजारांनी ग्रासले आहे. तालुक्‍याचे नेतेमंडळी या भागाला भेटी देतात, निवेदने घेतात. नागरिकांसमोर पाण्याचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देतात आणि निघून जातात पुन्हा या भागाकडे लक्षही दिले जात नाही.
या भागातील भामा नदीवर भामा – आसखेड धरण बांधले आहे. या भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी पाणलोटात गेल्या; पण याच भागातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दरवर्षी इतक्‍या लवकर प्रमाणात पाणी टंचाईचा सामना करावा लागत नव्हता. मात्र भामा आसखेड धरणाच्या पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात झाला असल्याने पश्‍चिम भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. वेळोवेळी पाण्याच्या टॅंकरची मागणी करूनही अजूनही टॅंकर सुरू केले नसल्याने पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याणे नागरिकांमध्ये असंतोष व्यक्त केला जात आहे. सध्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची शेतीची मशागतीची कामे उरकण्याची गडबड चालू आहे; दुसरीकडे पिण्याच्या पाण्याच्या शोधात पूर्ण दिवस वाया जात असल्याने शेतीतील कामे तशीच पडून राहिली आहेत.
भामा – आसखेड धरणामुळे या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न थोड्याफार प्रमाणात सुटला असे वाटत असतानाच प्रशासनाने धरणातील पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात केल्याने या भागातील पाण्याची पातळी अत्यंत खालावली आहे. यामुळे दरवर्षी पाण्याने भरलेल्या विहिरी यावर्षी पूर्णपणे कोरड्या पडल्या आहेत. यामुळे माणसांबरोबरच जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्जा-राजासहित गाई-म्हशी तसेच या डोंगर भागातील पशु – पक्ष्यांवर सुद्धा पिण्यासाठी पाणी मिळत नाही. नदीपात्रांमधील तसेच विहिरींमध्ये पाण्याचा थेंब नसल्यामुळे त्यांनाही तहानलेल्या पोटी पाण्यासाठी वणवण करीत फिरावे लागत आहे.
जनावरांसाठी पिण्यासाठी पाणी नसल्याने त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. यावेळी बैल अशक्त झाले असल्याने मशागतीची कामे पूर्ण होतील कि नाही हि भीती शेतकऱ्यांमध्ये पसरली आहे तर आहे. दुधाळ जनावरे अशक्त बनली असल्याने दुधाच्या उत्पादनात खूप मोठी घट झाली आहे. यामुळे दुधाळजनावरांची भाकड जनावरांमध्ये रुपांतर झाले असल्याने शेतकरी चिंतेने ग्रासला आहे शासनाने पाण्याची सोय केली नाही तर जनावरे मृत्युच्या दाढेत पडण्याची भीती शेतकऱ्यांना भेडसावत आहे.

गेली वीस पंचवीस दिवसांपासून रात्री अपरात्री पाणी आणावे लागत असून पाणी अतिशय खराब असल्याने बरेच नागरिक आजारी पडले आहेत.
-कविता निधन, गृहिणी तांबडेवाडी

वरील गावे टंचाई निवारण उपक्रमात घेतली असून तेथील नळ पाणी पुरवठ्याचे काम लवकरच सुरू होईल व तेथील पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवला जाईल.
-संजय मेस्त्री, पाणी पुरवठा विभाग खेड

  • जलस्त्रोत कोरडे पडले
    अनेक गावांच्या पाणी योजनेच्या मोटारी उघड्या पडल्या आहेत. पाण्याची पातळी अतिशय खालावली असल्याने बोअरचे पाणी गेले आहे. तर काही नवीन बोअरला पाणीच लागत नसल्याने नागरिकांचे खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानही झाले आहे. तर विहिरी कोरड्या ठाक पडल्या असल्याने नागरिकांना पाणी दोन – तीन किलोमीटरवरून पाणी डोक्‍यावर आणावे लागत आहे. तर काही मोटार सायकल, बैलगाडीवर पाण्याची वाहतूक करतात.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)