दत्ता जाधवच्या टोळीवरील मोक्‍क्‍याला मंजुरी

भुईंज येथील खंडणी प्रकरण; साताऱ्यासह सांगलीत 44 गुन्हे दाखल
सातारा,दि.20(प्रतिनिधी)

साताऱ्यसह सांगली जिल्ह्यात विविध गुन्हे दाखल असलेल्या दत्ता जाधव टोळीच्या मोक्काला मंजुरी मिळाली आहे. या टोळीच्या विरोधात भंगार व्यापाऱ्याला धमकावत खंडणी घेतल्याप्रकरणी भुईंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर तत्कालीन जिल्हा पोलिस अधिक्षकांनी मोक्काची कारवाई केली होती. त्यास पोलिस महानिरीक्षक नांगरे पाटील यांनी मंजुरी दिली होती. त्यानंतर अतिरिक्‍त पोलिस महासंचालकांनी अखेर दोषारोपपत्र दाखल करण्यास मंजुरी दिली आहे. दत्ता रामचंद्र जाधव( रा.प्रतापसिह नगर,सातारा) शुकराज पांडुरंग घाडगे (रा.तुपारी वसाहत,तुपारी जि. सांगली) शामराव विठ्ठल तेवरे (रा.तुपारी वसाहत,तुपारी जि. सांगली)कुमार जगन्नाथ खेतरी (रा. ताकारी,जि.सांगली) अशी मोक्का लागलेल्यांची नावे आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भुईंज, ता. वाई येथील इकबाल सय्यदतालीब हुसेन (वय 48 वर्ष) या भंगार खरेदी विक्रीचा व्यवसायिकाला किसनवीर कारखान्यावर विक्रीस काढलेल्या भंगाराचे टेंडर पाहिजे असल्यास दहा लाख रुपयांची मागणी दत्ता जाधव याने केली होती. मात्र, दहा लाख देण्यास नकार दिल्याने दत्ता जाधव व त्याच्या सात साथीदारांनी पिस्तुलाचा धाक दाखवून मारहाण करत जबरदस्तीने स्कॉरपीओ गाडीतून अपहरण करून तब्बल 32 लाख रुपयांची रोख रक्कम घेतल्याची तक्रार भुईंज पोलीस ठाण्यात दाखल झाली होती.

दत्ता जाधव व त्याच्या टोळीने तक्रारदाराला बारामती,सातारा या ठिकाणी मारहाण केली होती. त्यांच्याकडून बळजबरी व्यवसायाचा करार करून घेतला होता. तसेच याठिकाणी काम करायचे असल्यास आम्हाला चाळीस लाख रुपये द्यावे लागतील असा दम दिला होता.

घाबरलेल्या तक्रारदाराने संशयीतांना पुणे येथे बावीस लाख,त्यानंतर चार व सहा लाख दिले होते. त्यानंतर दत्ता जाधव व त्याचे साथीदार पैलवान (पूर्ण नाव माहित नाही) शुकराज घाडगे,शामराव तिवारी, कुमार खत्री व इतर चारजणांच्या विरोधात भुईंज पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर तत्कालीन जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील यांनी मोक्का कारवाईचा प्रस्ताव विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांच्याकडे पाठवला होता. नांगरे पाटील यांनी तो प्रस्ताव पुढील कारवाईसाठी अतिरीक्त पोलिस महासंचालक यांच्याकडे पाठवला होता. त्यांनी त्याची छाननी करून संबंधितावर मोक्का अंतर्गत दोषारोप दाखल करण्याची मंजुरी दिली आहे. याप्रकरणाचा तपास  वाई उपविभागाचे  डीवायएसपी  अजित टिके यांनी केला.

…. ते नेमके कोण?
दत्ता जाधव याच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात पोलिसांनी दत्ता जाधवचा मित्र पैलवान व इतर चार लोकांना आरोपी केले होते. मात्र अतिरीक्त पोलिस महासंचालकांनी दिलेली मंजुरी ही फक्त चार आरोपींच्या दोषारोप पत्राची असल्याने त्या इतर आरोपींचे नेमके काय झाले असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

कोल्हेकुईचा उपयोग झालाच नाही
यातील आरोपी शुकराज घाडगे याच्या नातेवाईकांनी पोलिसांवर आरोप करत आंदोलनाची नौटंकी केली होती. दरम्यान त्यांनी आपली कोल्हेकुई साताऱ्यापासून कोल्हापुरपर्यंत सुरूच ठेवली होती. मात्र हा सगळा प्रकार दबाव तंत्राचा भाग असल्याचे हेरत जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख यांनी हे प्रकरण अत्यंत शांतपणे हताळल्याने त्यांच्या कोल्हेकुईचा काही उपयोग झालाच नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)