दत्तक अल्पवयीन बहिणीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास सक्तमजुरी

अतिरिक्त सत्र न्यायालयाचा आदेश
पुणे, दि. 11 (प्रतिनिधी) – दत्तक अल्पवयीन बहिणीवर तब्बल चार महिन्याच्या कालावधीत वेळोवेळी बलात्कार करणाऱ्या 32 वर्षीय नराधमाला 10 वर्षे सक्तमजुरी आणि 500 रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी.सी.भगुरे यांनी हा आदेश दिला आहे.
ऍन्थॉनी ऍन्ड्युस जॉन (वय 32, रा. हडपसर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत पीडीत 14 वर्षीय मुलीने फिर्याद दिली आहे. ही घटना ऑक्‍टोबर 2014 ते 21 जानेवारी 2015 या कालावधीत घडली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहाय्यक जिल्हा सरकारी वकील सुनील हांडे यांनी 6 साक्षीदार तपासले. पीडित मुलीची साक्ष आणि वैद्यकीय पुरावा यामध्ये महत्त्वाचा ठरला. पोलीस हवालदार पी.पी. पवार आणि पोपट घुले यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.
ऍन्थॉनी आणि त्याच्या आईने पीडीत मुलीला मध्य प्रदेश, जबलपूर येथून दत्तक घेतले. त्या मुलीला हडपसर येथील घरी आणले. त्यानंतर ऍन्थॉनी याने त्या मुलीवर वेळोवेळी बलात्कार केला. याबाबतची माहिती पीडीत मुलीने ऍथॉनीच्या आईला दिली. त्यावेळी तिने तु खोटे बोलत आहे, असे म्हणत त्या मुलीलाच मारहाण केली. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी ऍन्थोनी आणि त्याच्या आईवर गुन्हा दाखल केला. तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयाने ऍन्थोनी याला दोषी धरत शिक्षा सुनावली. तर त्याच्या आईची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)