दगडफेकीचा वणवा! (अग्रलेख)

राजकारणातील व्यक्‍तिगत ईर्ष्येपोटी होणाऱ्या हिंसाचारापेक्षा थेट पक्षीय पातळीवरून होणाऱ्या हिंसाचाराचे स्वरूप व्यापक असते. जसे ते आपल्याला पश्‍चिम बंगालमध्ये बघायला मिळते. तेथील सध्याचा हिंसाचार मार्क्‍सवादी विरुद्ध तृणमूल या स्वरूपाचा आहे. अन्य राज्यातही या पक्षीय पातळीवरील हिंसाचाराचे लोण पसरते आहे. यापुढील आठ-नऊ महिन्याचा काळा हा सारा निवडणुकीच्या रणधुमाळीचा काळ आहे. त्याची सुरुवात मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यांवर दगडफेक करून होणार असेल तर यापुढे राजकारणातील निकोपता टिकवणे हे एक दिव्यच ठरणार आहे. 
सध्या मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या राज्यांत निवडणुकीच्या प्रचाराला जोर चढत आहे. तथापि, या तिन्ही राज्यांत सध्या एका विचित्र प्रकाराला सुरुवात झाली आहे. तेथे आता राजकीय दगडफेकीचे सत्र सुरू झाले आहे. या राज्यांत संघटितपणे असे प्रकार होण्याच्या घटना नवीनच आहेत. राजस्थान आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री सध्या आपापल्या सरकारच्या प्रचारार्थ यात्रांवर आहेत. या यात्राच काही ठिकाणी दगडफेकीचे लक्ष्य बनल्या आहेत.
राजस्थानात वसुंधराराजे यांच्या प्रचारार्थ निघालेल्या यात्रांवर दगडफेक करण्याचे काही प्रकार घडल्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या जन आशीर्वाद यात्रेवरही चुरहाट येथे आज दगडफेक करण्यात आली. हे दोन्हीही मुख्यमंत्री आपापल्या राज्यांत लोकप्रियतेच्या कळसावर पोहोचलेले मुख्यमंत्री आहेत असे भासवले जात असले तरी प्रत्यक्षात लोकांमध्येच त्यांच्याविषयी प्रचंड रोष असून त्यातूनच या दगडफेकीच्या घटना घडत असल्याचे सांगितले जात आहे. तथापि, या घटना म्हणजे लोकांच्या रोषातून निर्माण झालेली प्रतिक्रिया आहे की राजकीय वातावरण निर्मितीसाठी मुद्दाम तसे घडवून आणले गेल्याचा प्रकार आहे हे अजून नीट लक्षात आलेले नाही. पण एकुणातच हा एक चुकीचा पायंडा आहे, तो राजकीय आणि सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारा प्रकार आहे हे मात्र निश्‍चित.
दगडफेकीच्या या प्रकाराला कॉंग्रेस जबाबदार असल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला आहे तर कॉंग्रेसकडून याचा इन्कार करताना हा त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांवरील जनतेच्या रोषाचा परिणाम आहे असे काही कॉंग्रेस नेत्यांकडून सांगितले गेले आहे. तथापि कॉंग्रेसने मात्र या प्रकाराचा निषेध केला असून याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. एखादा मोठा गडबडीचा प्रकार घडल्यानंतर त्याच्या ज्या काही राजकीय प्रतिक्रिया दोन्ही बाजूंकडून येतात तशा त्या या दगडफेकीच्या प्रकरणात आल्या असल्या तरी या प्रकाराचे नेमके गांभीर्य दोन्ही बाजूंच्या नेत्यांच्या लक्षात आलेले नाही असेच म्हणावे लागेल. राजकीय द्वेषातून लोकांना हातात दगड घेऊन उभे राहण्यास प्रवृत्त करणे किंवा लोकांनीच स्वत:हूनच तसे करण्यास प्रवृत्त होणे हे दोन्ही प्रकार घातक आहेत.
सामाजिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्या या प्रकारांचे लोण वेळीच थांबवले गेले नाही तर त्याचे भीषण दुष्परिणाम संभवतात. निवडणुकांच्या राजकारणात हिंसाचाराचे लोण पुन्हा नव्याने सुरू करण्याचा हा प्रकार खरोखरच धोकादायक आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या यात्रांवर झालेली दगडफेक विरोधकांनी केली की स्वकियांनी केली हा जरी वादाचा विषय असला आणि तो क्षणभर बाजूला ठेवला तरी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर होणारी दगडफेक ही सरळसरळ राज्यातील कायदा व्यवस्थेलाच आव्हान देणारी आणि अराजकाला आमंत्रण देणारी ठरते. अशा प्रवृत्तीतून सैरभैर होणारे लोकसमूह एकूणच सामाजिक स्वास्थ्य बिघडवून टाकतात.
राजकीय वादातून व्यक्‍तिगत स्वरूपात होणाऱ्या हिंसक घटनांपेक्षाही समूहाच्या स्वरूपात होणाऱ्या या राजकीय हिंसाचाराचे लोण अधिक घातक आहे. टी. एन. शेषन यांच्या काळात राबवण्यात आलेल्या कडक निवडणूक आचारसंहितेमुळे निवडणुकीतील हिंसाचाराला आणि गुन्हेगारी प्रवृत्तीला मोठ्या प्रमाणावर पायबंद बसल्याचे दिसून आले होते पण आता सामूहिक स्वरूपात हा हिंसाचार डोके वर काढू पाहात आहे. आपल्याकडे एखाद्या प्रथेचे वेगाने अनुकरण होते. राजस्थानातील दगडफेकीच्या प्रकाराचे मध्य प्रदेशात अनुकरण झाले. त्यानंतर ते लोण छत्तीसगडमध्येही तुरळक प्रमाणात पोहचले आहे. ही मालिका वेळीच थांबवली गेली पाहिजे. भले त्यासाठी निवडणूक पुढे ढकलण्याची वेळ आली तरी एकवेळ परवडेल पण हे दगड हातात घेऊन एकमेकांच्या विरोधात धावून जाण्याला पायबंद बसला पाहिजे.
राजकारण हा एकमेकांची डोकी फोडण्याचा विषय बनता कामा नये. या प्रकारांबद्दल आपण एरव्ही उत्तर प्रदेश आणि बिहारच्या राजकीय धेंड्यांना दोष देत होतो; पण त्याच्यापेक्षाही भयंकर प्रकार आपण अलीकडच्या काळात पश्‍चिम बंगालमध्ये पाहिले आहेत. तेथे छोट्याछोट्या निवडणुकीत बॉम्ब आणि गोळीबाराचा वर्षाव होतो. हजार-पाचशे लोकवस्तीच्या गावात एकाच वेळी दोन- पाच जणांचे बळी जातात आणि डझनावारी लोक जखमी होतात. पश्‍चिम बंगालमधील हा हिंसाचार व्यक्‍तिगत स्पर्धा, ईर्ष्येतून नव्हे तर थेट पक्षापक्षांमधील संघर्षांतून होतो आहे. ज्या पक्षांनी हिंसेची विचारसरणी जोपासली त्यांच्या राज्यातच या राजकीय हिंसाचाराला पुन्हा मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेली दिसते आहे. राजकारणातील व्यक्‍तिगत ईर्ष्येपोटी होणाऱ्या हिंसाचारापेक्षा थेट पक्षीय पातळीवरून होणाऱ्या हिंसाचाराचे स्वरूप व्यापक असते. जसे ते आपल्याला पश्‍चिम बंगालमध्ये बघायला मिळते. तेथील सध्याचा हिंसाचार मार्क्‍सवादी विरुद्ध तृणमूल या स्वरूपाचा आहे.
अन्य राज्यातही या पक्षीय पातळीवरील हिंसाचाराचे लोण पसरते आहे. यापुढील आठ-नऊ महिन्याचा काळा हा सारा निवडणुकीच्या रणधुमाळीचा काळ आहे. त्याची सुरुवात मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यांवर दगडफेक करून होणार असेल तर यापुढे राजकारणातील निकोपता टिकवणे हे एक दिव्यच ठरणार आहे. आज आपल्याला या घटनांचे गांभीर्य फार वाटणार नाही. पण ज्या वेगाने हा राजकीय द्वेषाचा वणवा पसरतो आहे, तो हाताबाहेर गेला तर त्याला आवर घालणे हे कोणाच्याच हातात राहणार नाही हे लक्षात घेण्याची गरज आहे. त्यासाठी राजकीय धुरिणांनी जबाबदारीची भूमिका वठवण्याची गरज आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)