दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा टी-20 सामना; विजयी सांगता करण्याचे भारतासमोर लक्ष्य

केप टाऊन – भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यावर पुनरागमन करताना एकदिवसीय मालिकेत विजय मिळविला. आता उद्या (शनिवार) होणाऱ्या अखेरच्या टी-20 सामन्यात बाजी मारून अत्यंत रंगतदार अशा दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याची विजयाने सांगता करण्याचेच लक्ष्य भारतीय संघासमोर आहे.

तीन सामन्यांच्या या टी-20 मालिकेत सध्या 1-1 अशी बरोबरी झाली आहे. पहिल्या सामन्यात भारताने 28 धावांनी विजय मिळविल्यावर दुसरा सामना दक्षिण आफ्रिकेने 6 गडी व 8 चेंडू राखून जिंकला होता. अर्थात भारतीय संघाचा एकंदर दर्जा आणि अनेक प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त असल्यामुळे घटलेली दक्षिण आफ्रिकेची ताकद पाहता दुसऱ्या सामन्यातील पराभव मनाला लावून न घेता भारतीय संघाने तिसरा सामना जिंकण्याकडेच लक्ष देणे गरजेचे ठरेल.

-Ads-

भारतीय संघाने न्यूलॅंड्‌स मैदानावर यापूर्वी कधीही टी-20 सामना खेळलेला नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी नव्याने इतिहास लिहिण्याची ही संधी आहे. त्याउलट दक्षिण आफ्रिकेची या मैदानावरील कामगिरी तितकीशी चांगली नाही. त्यांनी येते खेळलेल्या 8 पैकी 5 सामन्यांत पराभव पत्करला आहे. त्यांच्या तीन विजयांपैकी दोन 2007 विश्‍वचषक स्पर्धेतील असून स्वतंत्र मालिकेतील एकमेव विजय 2016 मध्ये इंग्लंडविरुद्धचा आहे.

त्यामुळे यजमान संघ तसाही दडपणाखालीच असला, तरी भारतीय संघाची बाजू उगाचच वरचढ ठरत नाही. विजयासाठी आपल्याला सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार असल्याची भारतीय संघाला जाणीव आहे. कारण पावसामुळे षटके कमी करावा लागलेला दुसरा वन डे सामना किंवा दुसरा टी-20 सामना पाहिल्यास दक्षिण आफ्रिकेला झटपट क्रिकेटमध्ये अधिक रस असल्याचे दिसून येते. विशेष करून दुसरा सामना त्यांनी ज्या प्रकारे जिंकला, त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या ड्रेसिंग रूममध्ये आनंदाचे वातावरण होते.

   यजमानांच्या संघनिवडीकडे लक्ष

भारताविरुद्ध आम्ही अचूक डावपेच आखले असून त्याची प्रत्यक्ष मैदानावर अंमलबजावणी करणे आवश्‍यक असल्याचे कर्णधार ड्युमिनी सातत्याने सांगत होता. दुसऱ्या टी-20 सामन्यातील विजयामुळे त्याचा दावा खरा असल्याचे दिसून आले. मात्र दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज यशस्वी ठरले असले, तरी त्यांच्या गोलंदाजांना पाहिजे तितके यश मिळालेले नाही. त्यामुळे उद्याच्या सामन्यात ड्युमिनी संघनिवड कशी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. धडाकेबाज फलंदाज जॉन जॉन स्मट्‌स अद्याप यशस्वी ठरलेला नाही. तसेच डेव्हिड मिलरलाही लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. एकदिवसीय मालिकेतील अपयशानंतरही मिलरवर ठेवलेल्या विश्‍वासाला तो न्याय देऊ शकलेला नाही. हेन्‍रिच क्‍लासेन आणि ड्युमिनी यांच्या फलंदाजीमुळेच दक्षिण आफ्रिकेला दुसरा सामना जिंकता आला होता. तिसऱ्या सामन्यातही त्यांच्यावरच यजमानांची मदार राहील. त्याचप्रमाणे फरहान बेहर्डियन आणि फेलुकवायो यांच्याकडूनही जमानांना मोठ्या अपेक्षा आहेत.

प्रतिस्पर्धी संघ-

भारत- विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, सुरेश रैना, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, यजुवेंद्र चाहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, भुवनेश्‍वर कुमार, जसप्रीत बुमराह, जयदेव उनाडकत व शार्दूल ठाकूर.

दक्षिण आफ्रिका- जेपी ड्युमिनी (कर्णधार), फरहान बेहर्डियन, ज्युनियर डेला, ऍब डीव्हिलिअर्स, रीझा हेन्ड्रिक्‍स, ख्रिस्तियन जॉन्कर, हेन्‍रिच क्‍लासेन (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, ख्रिस मॉरिस, डेन पॅटरसन, ऍरॉन फॅंगिसो, अँडिले फेलुकवायो, तबरैझ शम्सी व जॉन जॉन स्मट्‌स.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)