#दक्षिणरंग : तामिळ अस्मितेचा अध्वर्यू : एम. करुणानिधी

हेमंत देसाई 

द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणानिधी हे आजारी असल्यामुळे त्यांना चेन्नई येथील एका खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रपतींपासून ते पंतप्रधानांपर्यंत अनेकांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. इस्पितळाच्या बाहेर नेते व कार्यकर्त्यांची एकच गर्दी उसळली आहे. भारतीय राजकारणतील या वादळी व्यक्‍तिमत्त्वाचा वेध. 

करुणानिधी यांची प्रकृती बिघडल्याचे समजल्यानंतर द्रमुकचे प्रवक्‍ते तामिलन प्रसन्ना यांच्या भावना तर इतक्‍या अनावर झाल्या की, दयानिधी मारन, ए. राजा आणि टी. आर. बालू या माजी केंद्रीय मंत्र्यांना त्यांना धीर देण्यासाठी पुढे यावे लागले. दक्षिणेत करुणानिधींविषयी अपार प्रेम असल्याचे अनेकदा दिसून येते. दोन वर्षांपूर्वी तमिळनाडू विधानसभेच्या निवडणुकांत जयललिता यांच्या अण्णाद्रमुकचा विजय होऊन, तो पक्ष सत्तेत आला. जयललिता यांच्या निधनानंतर अण्णाद्रमुकची लोकप्रियता झपाट्याने घसरली आहे. अण्णाद्रमुकमधून बंड करून टीटीव्ही दिनकरन यांनी स्वतंत्र पक्ष स्थापला. रजनीकांत आणि कमल हासन यांनी राजकारणात प्रवेश केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

उद्या जर लोकसभा निवडणुका झाल्या, तर त्यात तामिळनाडूमध्ये द्रमुक-कॉंग्रेस आघाडीस 41 टक्के, तर अण्णाद्रमुकला 25 टक्के मते पडतील, असा निष्कर्ष तामिळनाडूच्या थंती टीव्हीने केलेल्या ताज्या पाहणीत समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे यश पाहण्याचे भाग्य करुणानिधींना मिळायला हवे, असे त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटणे स्वाभाविक आहे. करुणानिधींचे वय 94 असून, त्यांना जनमानसाची नस पक्‍की ठाऊक आहे. वयाच्या 14 व्या वर्षापासून करुणानिधी सक्रिय राजकारणात आहेत आणि ते 50 वर्षे पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यांनी प्रादेशिक अस्मितेचेच राजकारण केले आहे. ईव्ही रामस्वामी नायकर अर्थात पेरियार यांनी 1920 च्या दशकात सुरू केलेल्या जहाल राजकीय चळवळीचा वारसा ज्यांच्याकडे आला होता, त्या सीएन अण्णादुराई यांनी सन 1949 मध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाची स्थापना केली.

द्रमुकने उत्तर भारतीय वर्चस्व व हिंदीची सक्‍ती या तिन्ही गोष्टींचा अव्हेर केला. तेव्हाच्या मद्रास प्रांतात सत्तेवर असलेल्या कॉंग्रेसला तेथून हद्दपार करणारा, हा भारतातील पहिला प्रादेशिक पक्ष ठरला. सन 1967 साली सत्तेवर आल्यानंतर, तामिळनाडूत पुढे कधीही कॉंग्रेस पक्ष स्वबळावर सत्तेवर येऊ शकला नाही. स्वातंत्र्यानंतरही सार्वभौम तामिळनाडू राष्ट्र निर्माण करण्याचा पवित्रा पेरियार यांनी सोडला नाही. अण्णादुराई यांना हे मान्य नसल्यामुळेच त्यांनी मूळ “तामिळ कळघम’ सोडत “द्रविड मुन्नेत्र कळघम’, म्हणजेच “द्रविड पुरोगामी महासंघ’ या पक्षाची स्थापना केली. पटकथाकार करुणानिधी हे त्यांचे पट्टशिष्य. पक्ष रुजवण्यासाठी द्रमुकने चित्रपटांचा प्रभावी वापर केला. आणि त्यासाठी त्यांना करुणानिधी यांची मदत झाली. त्यांच्यासमवेत एमजीआर हेदेखील होते. करुणानिधी व एमजीआऱ असल्या सिनेमावाल्यांचे सरकार सत्तेवर कसे येऊ शकेल, असा सवाल मद्रास प्रांताचे तेव्हाचे मुख्यमंत्री के. कामराज यांनी केला होता. मात्र, त्या निवडणुकीत द्रमुकचाच विजय झाला आणि कॉंग्रेसचे पानिपत झाले. सन 1969 साली अण्णादुराई यांचे निधन झाले. त्यानंतर करुणानिधी व एमजीआर यांच्यात मतभेद निर्माण होऊन, 1972 साली एमजीआरनी अण्णाद्रमुकची स्थापना केली.

पेरियार आणि अण्णादुराई यांच्यासमवेत काम केले असल्यामुळे करुणानिधी यांच्यात द्रविड विचारसरणी पुरेपूर रुजलेली आहे. ते स्वतः उत्तम कादंबरीकार, गीतकार, संवादलेखक आणि वक्‍ते आहेत. त्यांच्या वैचारिक भूमिका सुस्पष्ट आहेत. सामान्यतः विचारवंत माणूस सामान्यांपासून फटकून असतो. परंतु पक्षकार्यकर्ते असोत वा सामान्य माणूस, त्यांच्याशी जवळिकीने वागणारा हा नेता आहे. द्रमुकचे पक्षसंघटन मजबूत आहे. पक्षकार्यकर्त्यांत भावनिक बांधिलकी आहे. करुणानिधी यांचे वैशिष्ट्‌य म्हणजे, प्रादेशिक पक्ष असूनही, राष्ट्रीय प्रतिमा निर्माण करण्यात ते यशस्वी ठरले आहेत. शिवाय राजकीय लवचिकता असल्यामुळे, ते भाजपप्रणीत रालोआतही होते आणि नंतर कॉंग्रेसप्रणीत संपुआमध्येही. एमजीआर यांनी मध्यान्ह आहार योजना, सवलतीत आरोग्य सुविधा यासारख्या कल्याणकारी योजना सुरू केल्या. तर करुणानिधी यांनी रस्ते, सिंचन, उद्योगधंदे यावर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे व्यापारी व उद्योजकांशी त्यांचे सलोख्याचे संबध आहेत.

टु-जीसारख्या अनेक प्रकरणांत द्रमुकच्या नेत्यांना तुरुंगात जावे लागले आणि हा पक्ष भ्रष्ट असल्याची प्रतिमा तयार झाली, हे वास्तव नाकारण्याचे कारण नाही. वय झाले तरी करुणानिधी यांची जिद्द आणि विनोदबुद्धी जिवंत आहे. तरुणपणी करुणानिधी “मनावरनेसन’ हे हस्तलिखित स्वरूपातील वृत्तपत्र प्रसिद्ध करत. स्थानिक तरुणांसाठी त्यांनी एक संघटनाही काढली होती. त्यानंतर द्रविड चळवळीची विद्यार्थी शाखाही त्यांनी काढली. तरुणांना त्यांनी सामाजिक कार्यातही गुंतवले. “मुरासोली’ हे पक्षाचे अधिकृत वृत्तपत्र सुरू केले. कल्लाकुडी या उद्योगनगरीचे नाव दालमियापुरम्‌ करण्यात आले, तेव्हा या नामांतराविरुद्ध द्रमुकने आंदोलन छेडले. उद्योगपती दालमिया यांनी सिमेंट कारखाना काढल्यानंतरच त्या गावाचे नाव बदलण्यात आले होते. करुणानिधी व त्यांच्या सहकाऱ्यांनी रेल्वे स्टेशनात घुसून “दालमियापुरम्‌’, ही पाटी फेकून दिली व गाड्या अडवल्या. त्या आंदोलनात त्यांना अटकही झाली होती.

सन 1957 च्या निवडणुकीत, म्हणजे वयाच्या 33 व्या वर्षी ते प्रथम विधानसभेवर निवडून आले. त्यानंतर 12 वर्षांनीच ते तामिळनाडूचे मुख्यमंत्री बनले. 2006 साली करुणानिधींनी पाचव्यांदा तामिळनाडूचे मुख्यमंत्रिपद भूषवले. अण्णाद्रमुककडून पराभव होऊन सत्ता गेल्यानंतरही, करुणानिधी यांनी कधीही हार न मानता पक्ष जिवंत ठेवला. तामिळनाडू विधानसभेवर ते 13 वेळा निवडून आले आहेत. तामिळी अस्मिता जागवण्याचे काम करुणानिधी यांनी सातत्याने केले. सन 1970 मध्ये तिसऱ्या जागतिक तामिळ परिषदेत त्यांनी दिलेले भाषण गाजले. सन 1987 मध्ये कौलालंपूर येथे भरलेल्या जागतिक तामिळ परिषदेतही त्यांनी भाग घेतला. सन 2010 मध्ये वर्ल्ड क्‍लासिकल तामिळ कॉन्फरन्स भरली होती, त्याचे थीमसॉंग करुणानिधी यांनी रचले व त्यास चाल लावली होती, ए. आर. रेहमानने.

करुणानिधी हे एक उत्तम प्रशासक असून, तामिळ भाषा, संस्कृती व परंपरा यावर त्यांचे कमालीचे प्रेम आहे. अस्मिता जागी ठेवून विकासही साधता येतो, हे त्यांनी दाखवले. शिवसेनेप्रमाणे केवळ नकारात्मकतेचे आणि विध्वंसाचे राजकारण त्यांनी केले नाही. अर्थात वीरनम प्रकल्पाच्या निविदांचे वाटप करताना भ्रष्टाचार केल्याबद्दल सरकारिया आयोगाने त्यांच्यावर ताशेरे मारले होते. भ्रष्टाचार आणि अलगतावादी राजकारणाचा आरोप ठेवून, इंदिरा गांधी यांनी करुणानिधी सरकार बरखास्त केले होते. चेन्नईमधल्या उड्डाणपुलाच्या बांधकामातील गैरव्यवहाराबद्दल आरोप ठेवून, 2001 साली त्यांना अटकही झाली होती. जयललिता यांनी तर सूडबुद्धीने त्यांना मध्यरात्री पोलीस पाठवून अटक केली होती. एखाद्या माजी मुख्यमंत्र्याला यापद्धतीने तुरुंगात डांबणे हे अमानुषपणाचे होते. त्याबद्दल जयललिता यांच्यावर देशभरातून टीका झाली. तामिळ वाघांना उत्तेजन दिल्याबद्दल न्या. जैन आयोगाने त्यांच्यावर ताशेरेही मारले होते. द्रमुक म्हणजे एक कुटुंबशाही आहे आणि या कुटुंबीयांतही प्रचंड वाद आहेत. तरीदेखील कुटुंबाला व पक्षाला एक ठेवणारा हा माणूस दशकानुदशके जनतेच्या मनात घर करून राहतो. म्हणूनच करुणानिधींच्या आरोग्यासाठी अवघी तामिळ जनता आज प्रार्थना करत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)