दंड भरल्यानंतरही दोन तास प्रबोधन

अमरसिंह भातलवंडे

नियम तोडणाऱ्यांसाठी आरटीओंचे पाऊल : सेल्फ सेफ्टी व्हिडीओ पाहणे बंधनकारक
पिंपरी- रस्ते अपघातात मृत्यूमुखी व जखमी होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. हा आकडा वाढत असतानाच इकडे वाहतूक नियम मोंडणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, यासाठी वाहतूक पोलीस आणि परिवहन अधिकाऱ्यांकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात येत असतात. मात्र, तरीही नियम मोंडणाऱ्यांची संख्या कमी होत नसल्याने आता वाहनचालकांना स्वयंशिस्त लागावी या उद्देशाने आता प्रबोधनाबरोबरच सेल्फ सेफ्टीचा व्हिडीओही दोन तास पाहणे बंधनकारक करण्यात येणार आहे. दंड भरला तरीही प्रबोधनाला हजर राहणे आवश्‍यक असून त्याशिवाय वाहन सोडण्यात येणार नसल्याने वाहतुकीचे नियम मोंडणाऱ्यांची पुढील काही दिवसात चांगलीच अडचण होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. भरधाव वेगात वाहन चालवणे, मद्यपान करुन वाहन चालवणे, ओव्हरलोड माल वाहतूक करणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी वाहतूक करणे, विना हेल्मेट वाहन चालवणे, सीटबेल्टचा वापर न करणे, वाहन चालवत असताना मोबाईलचा वापर करणे अशा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक पोलीस व आरटीओकडून कारवाई करण्यात येत असते. एकट्या पिंपरी-चिंचवड शहरात वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरणी दर महिन्याला लाखो रुपयाचा दंड पोलिसांकडून आकरण्यात येत आहे. एवढा दंड आकारल्यानंतरही वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत. राज्यात दरवर्षी रस्ते अपघातामध्ये 15 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू होतो तर 30 हजारहून अधिक लोक जखमी होतात. यामध्ये सर्वाधिक दुचाकीस्वारांचा समावेश असतो.

या पार्श्‍वभूमीवर आता आरटीओंनी नवीन शक्कल काढली असून वाहतूक निमयांचे उल्लंघन केल्यानंतर दंड तर भरावाच लागणार आहे. शिवाय उपप्रादेशिक कार्यालयात जावून दोन तास प्रबोधन आणि समुपदेशनही करण्यात येणार आहे. या समुपदेशन वर्गाला हजेरी लावल्यानंतरही वाहनधारकांना त्यांचे वाहन ताब्यात दिले जाणार आहे. त्यामुळे आता तरी या दोन तासांच्या भितीने वाहतुकीचे नियम मोंडणाऱ्यांची संख्या कमी होईल अशी अपेक्षा अधिकांऱ्यातून व्यक्‍त करण्यात येत आहे.

बेशिस्त वाहनधारकांच्या शिस्तीसाठी
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनधारकांची मूळ कागदपत्रे किंवा वाहन जप्त करण्यात येत असते. संबंधित व्यक्‍ती दंड भरल्यानंतर कागदपत्रे अथवा वाहन घेण्यासाठी आल्यानंतर संबंधित चालकांना प्रबोधनवर्गाला हजर राहणे बंधनकारक करण्यात येणार आहे. लर्निंग लायसन्स काढणाऱ्याला व नियम मोडणाऱ्यांसाठी हा नवा नियम करण्यात येणार आहे.

दिवसेंदिवस वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे, त्यामुळे आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. पुढील काळत वाहनचालकाला दंड भरला तरी या वर्गाला हजर रहावे लागणार आहे. उपप्रादेशिक कार्यालयात प्रबोधनसाठी आवश्‍यक असणाऱ्या हॉलचे काम सुरू आहे. लवकरच प्रबोधनाचे वर्ग सुरु करण्यात येणार आहेत.
आनंद पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)