…दंड न भरण्याचे जनतेला आवाहन

निवडणूक फंड गोळा करण्यासाठीच प्लॅस्टिकबंदी


राज ठाकरेंची रामदास कदमांवर बोचरी टीका

मुंबई – शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी प्लॅस्टिक उत्पादक व्यापाऱ्यांकडून निवडणूक फंड गोळा करण्यासाठी प्लॅस्टिकबंदीचा निर्णय घेतला आहे, अशी बोचरी टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यावर केली.

प्लॅस्टिकबंदीचा निर्णय हा सरकारचा आहे की एका खात्याचा आहे हे स्पष्ट होत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत अद्याप कोणतेही वक्तव्य केलेले नाही, असे सांगतानाच राज ठाकरे यांनी सर्वसामान्य जनतेने प्लॅस्टिकबंदीचा दंड भरू नये असे आवाहन केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी गेल्या शनिवारपासून राज्यात प्लॅस्टिकबंदीचा निर्णय घेतला. या निर्णयावर राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडत त्यांच्यावर सडकून टीका केली. कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्लॅस्टिकबंदीचा निर्णय हा नोटाबंदीच्या निर्णयासारखाच आहे. कचऱ्याच्या विल्हेवाटीसंदर्भात राज्यसरकार, महापालिका या स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पाडत नाहीत. सरकार आणि महापालिका आपले अपयश जनतेच्या माथी मारत आहेत, असे राज ठाकरे म्हणाले.

एखाद्याला आलेला झटका हे काही राज्याचे धोरण असू शकत नाही. मुळात प्लॅस्टिक आदी कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ही महापालिकांची असते. आज महापालिकांनी किती ठिकाणी कचराकुंड्या लावल्या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी असणाऱ्या डंपिंग ग्राउंडच्या जागा आज बिल्डरांच्या घशात जात आहेत. महाराष्ट्रातील नद्यांमध्ये खुलेआम प्रदूषित पाणी सोडण्यात येत आहे. पर्यावरणमंत्री रामदास कदम त्याबाबत काहीच का बोलत नाहीत, असा सवाल त्यांनी केला.

शहरांमध्ये परराज्यांतून लोक येतात, मोठ्या प्रमाणात झोपडया वसवतात. त्यांच्यावर कोणी दंड का आकारत नाही आज जनतेचे जीवनच प्लॅस्टिकमय झाले आहे. प्लॅस्टिक इथे तिथे फेकणे हे गैरच आहे. पण जोपर्यंत त्याला योग्य पर्याय देत नाहीत तोपर्यंत ही कारवाई कशाला? म्हणून जोपर्यंत सरकार योग्य पर्याय देत नाही तोपर्यंत जनतेने दंडाचा एक रूपयाही भरू नये असे आवाहन राज ठाकरे यांनी केले. मनसेचे कार्यकर्ते जनतेला योग्य ती साथ देतील असेही ते म्हणाले.

नाशिक महापालिकेत मनसेची सत्ता होती तेव्हा आम्ही कचरा गोळा करून त्याचे विघटन करून इंधन तयार करण्याचा प्रकल्प सुरू केला. प्लॅस्टिक पिशव्यांपासून तिथे रोज 1200 ते 1500 लिटर इंधन तयार केले जात होते. प्लॅस्टिकपासून इंधनाचा प्रयोग नाशिकमध्ये यशस्वी झाला. मुंबई,ठाणे येथे असा प्रयोग का होत नाही असा सवालही राज ठाकरे यांनी केला.

कदमांनी नात्यांबद्दल बोलू नये…
रामदास कदम यांनी काकाला पुतण्याची भीती कधी पासून वाटायला लागली असा खोचक प्रश्न राज ठाकरेंना उद्देशून विचारला होता. त्याचा राज ठाकरेंनी समाचार घेतला. मुळात रामदास कदम यांनी हा विषय नात्यांशी जोडू नये. सांगकाम्यांना त्यातले काही कळत नाही. हा निर्णय रामदास कदम यांनी घेतला आहे. त्यामुळे त्यांना जे प्रश्न विचारले जातील त्याचे उत्तर त्यांनी द्यावे. निर्णय सरकारने घेतला आहे, सरकारने याचे उत्तर द्यावे. नात्यात काय वाद होतील याची अपेक्षा ठेवणे त्यांचे काम नाही, असेही राज ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी मराठेंवर राग काढला…
बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या रविंद्र मराठेंना अटक करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठेंवर राग काढल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. ते म्हणाले, पीककर्जाच्या संदर्भातील कमिटीवर रविंद्र मराठे होते. सरकार पीककर्जाच्या बाबतीत शेतकऱ्यांची फसवणूक करते आहे यावर मराठेंनी बोट ठेवले. तेव्हा मुख्यमंत्री भडकले. त्याचा राग त्यांनी मराठेंवर काढला. मुळात हा विषय रिझर्व्ह बॅंकेचा आहे. मराठेंना पोलीस अटक करतात आणि त्याची माहिती मुख्यमंत्र्यांना नसते. यावर विश्वास बसत नाही.

बॅंकेच्या संचालकांना अटक झाल्यानंतर बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या खातेदारांची काय अवस्था झाली असेल. मराठेंना अटक झाली मग चंदा कोचर बाहेर कशा? भाजपाध्यक्ष अमित शहा संचालक असलेल्या बॅंकेत नोटाबंदीच्या काळात कोट्यवधी जमा झाले. त्यांच्यावर कारवाई का नाही? बॅंक ऑफ महाराष्ट्र ही काही कालावधीनंतर बॅंक ऑफ बडोदामध्ये विलीन करण्याचे कारस्थान सुरू असल्याची चर्चा असल्याचा आरोपही राज ठाकरेंनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)