थोरातांची नियुक्ती हा नगरचा सन्मान

पवार यांचे कौतुकोद्‌गार; नेत्यांचे मोहोळ असलेल जिल्हा

प्रभात वृत्तसेवा
नगर – स्वांतत्र्यपूर्व काळात रावसाहेब व अच्युतराव पटवर्धन हे कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य होते. स्वातंत्र्योत्तर काळात हा मान नगर जिल्ह्यात मिळवणारे बाळासाहेब थोरात हे एकमेव नेते आहे. त्यांच्या नियुक्तीने नगर जिल्ह्याचा ही सन्मान झाला आहे, असे गौरवोद्‌गार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काढले. नगर जिल्हा हा नेत्यांचे मोहोळ असलेला जिल्हा असल्याचे ते म्हणाले.
नगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रामनाथ वाघ यांच्या कृतज्ञता सोहळ्यात त्यांच्या कृतार्थ जीवन व वळून पाहताना या दोन पुस्तकांचे प्रकाशन पवार यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार बाळासाहेब थोरात होते. या वेळी व्यासपीठावर वाघ दांपत्य, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री मधुकरराव पिचड, आमदार अरुण जगताप, माजी आमदार अण्णासाहेब म्हस्के, दादा कळमकर, अनिल राठोड, प्रा. शशिकांत गाडे, घनश्‍याम शेलार, प्रशांत गडाख, रावसाहेब म्हस्के, माजी खासदार दादा पाटील शेळके, पाडुंरंग अभंग, आदर्श गाव योजना संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, कार्याध्यक्ष संदीप वर्पे, बडोदा येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख आदी उपस्थित होते.
ुपवार यांनी आपण कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर होतो आणि त्या पदाला किती महत्त्व असते, हे सांगून थोरात यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवरील निवडीने महाराष्ट्राचाही सन्मान झाल्याचे सांगितले. सेवाग्राममध्ये कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेण्यास झालेल्या विरोधाचा उल्लेख टाळून ते म्हणाले, की पूर्वी सेवाग्राममध्ये कॉंग्रेसच्या अनेक बैठका होत. थोरात यांची या पार्श्‍वभूमीवर झालेली निवड अतिशय सार्थ आहे. नगर जिल्ह्यातील नेत्यांचे एक वैशिष्ठ्य आहे, ते म्हणजे ही नेते मंडळी अतिशय सामान्य कुटुंबातून पुढे आली. परिस्थितीशी ते झगडले. राजकीय पार्श्‍वभूमी नसताना त्यांनी राजकारणात आणि समाजकारणात आपल्या कर्तृत्त्वाचा ठसा उमटविला. अण्णासाहेब शिंदे, भाऊसाहेब थोरात, पद्मश्री विखे पाटील, शंकरराव काळे, आबासाहेब निंबाळकर, कॉ. पी. बी. कडू यांच्याच मालिकेत रामनाथ वाघ यांचा समावेश करावा लागेल. यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराचा महाराष्ट्रावर पगडा होता. त्यांचे भाषण ऐकायला आम्ही तीस-चाळीस किलोमीटर सायकलवर जात असू. राज्य, देश आणि परदेशातही भारताचे नेतृत्त्व केलेल्या चव्हाणांनी महाराष्ट्रात एक पिढी घडविली. जिल्हा परिषद, पंचायत समित्या या नेतृत्व घडविणाऱ्या कार्यशाळा ठरल्या. त्यातून काळे, पद्मसिंह पाटील, विलासराव देशमुख यांच्यासारखे नेते घडले. वाघ ही त्याच परंपरेतले आहेत.
थोरात यांनी त्यांच्या भाषणात वाघ यांच्या कांद्याच्या परखड भूमिकेमुळे पवार यांना राग आला असावा आणि ते उठून आतल्या दालनात गेल्याचा उल्लेख केला. त्यावर पवार म्हणाले, की निस्वार्थीपणे भूमिका कोण घेतो, याची आपल्याला चांगलीच माहिती आहे. कांद्याचे भाव वाढले, की कांद्याच्या माळा घालून येणारे भाजपचे खासदार मला कृषिमंत्री असताना कायम भेटायचे;परंतु कांद्याचे भाव पडले, की एकही जण मला भेटायला यायचा नाही. वाघ यांनी प्रश्‍न मांडल्यानंतर मी रागावलो नाही, तर आतल्या दालनात जाऊन तेथून प्रधान सचिवांशी चर्चा केली आणि बाहेर येताच शंभर रुपये अनुदानाची घोषणा केली. बागायती पट्टयात ऊस आणि थोडे पाणी असलेल्या भागात कांदा हीच नगर जिल्ह्यातील मुख्य पिके आहेत. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे प्रश्‍न किती कठीण आहेत, याची आपल्याला माहिती आहे.
लखनऊ विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे, देशमुख, प्राचार्य खासेराव शितोळे, वळसे पाटील, डॉ. अभिजीत पाठक आदींची या वेळी भाषणे झाली. दशरथ खोसे यांनी आभार मानले.

-Ads-

विखेंकडून पवारांचा सत्कार

या कार्यक्रमात प्रवरा एज्युकेशन संस्थेच्या वतीने डॉ. सूजय विखे यांनी पवार यांचा सत्कार केला. सूत्रसंचालक प्रसाद बेडेकर यांनी मात्र मुळा एज्युकेशनकडून सत्कार असा उल्लेख केल्यानंतर सभागृहात खसखस पिकली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)