थेरगाव रुग्णालयात शहरातील पहिले “बर्न युनिट’

प्रशांत घाडगे

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात एखादा स्फोट अथवा आगीची दुर्घटना घडल्यास जखमी रुग्णांना पुणे अथवा खासगी रुग्णालयात दाखल केले जात होते. यामुळे, रुग्णांची गैरसोय लक्षात घेऊन महापालिकेच्या थेरगाव येथील नव्याने बांधकाम सुरु असलेल्या सुसज्ज रुग्णालयात जळीत कक्ष (बर्न युनिट) उभारण्यात येणार आहे. शहरातील आगीच्या दुर्घटनेत जखमी होणाऱ्या रुग्णांना तत्काळ उपचार मिळण्यासाठी 30 खाटांची क्षमता असलेले शहरातील पहिले “बर्न युनिट’ तयार होत आहे.

-Ads-

पिंपरी-चिंचवड शहराचे वाढते विस्तारीकरण लक्षात घेता या ठिकाणी भाजलेल्या रुग्णांसाठी विशेष रुग्णालयाची आवश्‍यकता होती. या शहरात झपाट्याने औद्योगिकरण वाढत आहे. तसेच, चाकण, भोसरी, थेरगाव, आळंदी या भागात एमआयडीसी परिसरातील कंपन्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे, एखादी दुर्घटना घडल्यास जखमींना तत्काळ उपचार मिळणे आवश्‍यक आहे. यापूर्वी, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शहरातील एकाही रुग्णालयात जळीत कक्ष तयार केलेला नव्हता. यामुळे, रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत होती.

याची दखल महापालिकेने घेऊन थेरगाव येथील रुग्णालयात 30 खाटांची क्षमता असणारा कक्ष उभारण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. तसेच, भाजलेल्या रुग्णासाठी अद्ययावत शस्त्रक्रिया विभाग तयार करण्यात येणार आहे. सर्व सोई-सुविधायुक्त जळीत कक्ष होणार असल्याने नागरिकांची अडचण दूर होणार आहे.

थेरगाव येथील रुग्णालयात “बर्न युनिट’बरोबर तातडीची सेवा, बाह्यरुग्ण विभाग, अतिदक्षता विभाग, प्रसूती व नवजात शिशू विभाग, बालरुग्ण, कान, नाक, घसा, नेत्र विभाग, अस्थिरोग, सहा शस्त्रक्रिया विभाग कार्यान्वित केले जाणार आहेत. 200 खाटांची क्षमता असलेल्या रुग्णालयात विविध विभाग प्रकारच्या सुविधा मिळणात आहेत. या रुग्णालयामुळे नागरिकांच्या आरोग्याचा महत्त्वाचा प्रश्‍न सुटणार आहे.

असे असेल “बर्न युनिट’
– रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर “बर्न युनिट’
“- बर्न युनिट’साठी 30 खाटांची क्षमता
– भाजलेल्या रुग्णांसाठी शस्त्रक्रिया विभाग
– त्वचा पेढीची (स्किन बॅंक) सुविधा
– फिजिओथेरपी व डायलिसीस विभाग

रुग्णालयाची तहान कक्षावर!
पिंपरी-चिंचवड शहराच्या लोकसंख्येने सुमारे 22 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. महापालिका, एमआयडीसी आणि प्राधिकरण अशा तीन संस्थांमध्ये शहराची विभागणी झाली आहे. औद्योगिक परिसर, हिंजवडी व तळवडे आयटी पार्क तसेच “रेडझोन’चा शहरात समावेश आहे. हॉटेल्स, मॉल्ससारख्या वाणिज्य अस्थापनांची संख्या वाढत आहे. शहरात वारंवार आगीच्या घटना घडत असतात. भंगार मालाच्या दुकानांना वारंवार आग लागण्याच्या घटनांमुळे चिखली परिसर कायम धुमसत असतो. त्यामुळे शहरात “बर्न’ रुग्णालयाची मागणी गेली अनेक वर्षे होत आहे. मात्र, रुग्णालयाऐवजी महापालिका “बर्न वॉर्ड’ उभारत असल्याने “दुधाची तहान ताकावर’ भागवण्याचा हा प्रकार असल्याची टीका होत आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)