थेरगाव फाटा रस्त्यावर ऑईल गळती

वाकड – थेरगाव फाटा येथे बुधवारी (दि. 27) सकाळी ऐन वर्दळीच्या वेळेस एका चारचाकी वाहनातून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ऑईल गळती झाली. त्यामुळे दहा ते बारा दुचाकी घसरून पडल्या. यामध्ये सहा दुचाकी चालक जखमी झाले. थेरगाव सोशल फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी समय सुचकता दाखवत ताबडतोब वाहतूक दुसऱ्या बाजूने वळवली. त्यामुळे पुढील अपघात टळले. अग्निशमन दलाने धाव घेत रस्ता धुतल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

आयटीनगरीला जोडणारा पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवड डांगे चौक हा महत्त्वाचा रस्ता मानला जातो. प्रामुख्याने सकाळी आणि सायंकाळी या रस्त्यावर प्रचंड वर्दळ असते. आज सकाळी साडेनऊच्या सुमारास बारणे चाळ ते थेरगाव फाटापर्यंत रस्त्यावर अज्ञात वाहनामधून मोठ्या प्रमाणात ऑइल गळती झाली होती. वाहतूक प्रचंड असल्याने अनेक दुचाकीस्वार घसरुन पडू लागले, काही मोठ्या प्रमाणात जखमी झाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रत्येक जण घाईगडबडीत असल्याने कोणी थांबत नव्हते. ही माहिती सुहास शिगवण आणि रुपेश पाटसकर यांनी थेरगाव सोशल फाउंडेशनच्या स्वयंसेवकांना दिली तत्काळ तरूणांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक दुसऱ्या बाजूने वळविली. तसेच अग्निशमन दलाच्या मदतीने रस्त्यावर पडलेले ऑईल साफ केले. रस्ता धुवून साफ होईपर्यंत सुमारे तासभर वाहतुकीचा खोळंबा झाला होता. यावेळी राहुल सरवदे, अंकुश कुदळे, प्रशांत चव्हाण, अशोक धुमाळ, सचिन झरेकर, शेखर गांगर्डे हे फाउंडेशनचे स्वयंसेवक उपस्थित होते.

“त्या’ वाहनांवर कारवाईची मागणी
डांगे चौक रस्त्यावर ऑईल गळतीच्या वारंवार घटना घडत आहेत. यामध्ये अनेकजण जखमी होत आहेत. तसेच दुचाकी वाहनांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. ज्या वाहनांमधून ऑईल गळती होते ते पुढे निघून जाते. मात्र पाठीमागून येणाऱ्या वाहनांना खासकरून दुचाकीस्वारांना याची मोठी किंमत मोजावी लागते. वारंवार घडणाऱ्या या घटना प्रवाशांच्या जीवावर बेतू शकतात. त्यामुळे वाहतूक विभागाने अशा वाहनांचा माग काढून त्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)