थेरगावात पुन्हा शस्त्र टोळक्‍याचा धूडगूस

वाकड – शहरातील विविध भागातील टोळक्‍याचा धूडगूस तसेच वाहनांच्या तोडफोडीचे सत्र थांबताना दिसत नाही. ताथवडे परिसरातील वाहनांच्या तोडफोडीची घटना ताजी असताना थेरगावमध्ये पुन्हा टोळक्‍यांनी हातात हत्यारे घेऊन दहशत माजवत वाहनांची तोडफोड केली. बुधवारी (दि.23) रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे थेरगाव आणि परिसरात नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण पसरले असून नागरीक आता पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच शंका उपस्थित करू लागले आहेत.

या प्रकरणी करण शिंदे, चिक्‍या सूर्यवंशी, नवनाथ भातकुटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे तर इतर फरार आहेत. महेश मुरलीधर तारू (वय-43, रा. नम्रता हाऊसिंग सोसायटी, नखातेनगर, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री अकराच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या तिघाजणांनी नम्रता हाऊसिंग सोसायटीमध्ये गोंधळ घालण्यास सुरूवात केली. यावेळी महेश यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी महेश यांना कोयता दाखवून धमकावले तसेच त्यांनी परिसरात उभ्या असलेल्या 11 वाहनांची तोडफोड केली यात दुचाकी व चारचाकी, रिक्षा अशा वाहनांचा समावेश आहे.

दरम्यान शहरातील विविध भागात सतत घडणाऱ्या वाहन तोडफोडीच्या घटना आणि हातात खुलेआम शस्त्र घेत हैदोस घालणारे टोळके यामुळे पिंपरी-चिंचवडकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सततच्या या प्रकारामुळे नागरिक भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत. मात्र अशा घटनांतील आरोपींचा बंदोबस्त करण्यात पोलीस कुठेतरी कमी पडत असल्याची भावना नागरिकांमध्ये तयार होत असून पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचक संपला की काय असा प्रश्न आता नागरीक विचारू लागले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)