थेरगावात पथ संचलनाचा भव्य सोहळा

वाकड – पिंपरी चिंचवड शहराच्या इतिहासात प्रथमच प्रजासत्ताक दिनी सामुहिक पथ संचलन सोहळा थेरगाव येथे आयोजित करण्यात आला होता. यात तब्बल 15 शाळांचे सुमारे 4500 विद्यार्थी सहभागी झाले होते. वेगवेगळ्या राज्यांचे सांस्कृतिक कला, परंपरेचे दर्शन घडवणारी विविध पथके, रहिवाशी सोसायट्यांची वेगळी पथके, अंध-अपंग तसेच वकील डॉक्‍टर्स यांची पथके, ज्येष्ठ नागरिकांची पथके आकर्षक आणि शिस्तमय वातावरणात विविधतेतून एकतेचे दर्शन घडवत हा नयनरम्य सोहळा थेरगावच्या रस्त्यावर अवतरला होता. या पथसंचलनाच्या माध्यमातून स्वच्छतेचा आणि पर्यावरणाचा संदेश देखील देण्यात आला.

महानगरपालिकेच्या ग क्षेत्रीय प्रभाग, साने गुरूजी विद्यालय, संचेती विद्यालय, एम एम विद्यालय, यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय यांच्या विशेष सहकार्याने थेरगाव डेव्हलपमेंट फाऊंडेशनकडून या भव्य पथ संचलनाचे आयोजन करण्यात आले होते. नुकतेच पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आलेले पॅरालम्पिक विजेते मुरलीकांत पेटकर, अंशुमन सिंह तसेच हिंदी भाषेत देशात प्रथम आलेल्या शाहीर पूनम या मान्यवरांच्या हस्ते ग प्रभाग कार्यालयाजवळ ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ग प्रभाग अध्यक्ष अभिषेक बारणे, प्रशासन अधिकारी श्रीनिवास दांगट, नगरसेविका अर्चना बारणे, झामाताई बारणे, कैलास बारणे, चिंचवड-किवळे भाजपा मंडल अध्यक्ष काळुराम बारणे, मोहनलाल संचेती, तानाजी बारणे आदी मान्यवर उपस्थित होते.

थेरगाव फाटा ते थेरगाव गावठाण हा सुमारे दोन किलोमीटरचा रस्ता पथसंचलन पाहण्यासाठी दुतर्फा गर्दीने अक्षरशः फुलून गेला होता. देशातील विविध राज्यांची वेशभूषा, परंपरा, सामर्थ्याचे सादरीकरण करत चित्तथरारक प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. विविधततेने नटलेल्या देशाच्या आध्यात्मिक, ऐतिहासीक संस्कृतीचे दर्शन घडवत एक एक पथक सलामी देत, भारत मातेच्या घोषणा देत पुढे सरकत होते. थेरगाव मध्ये जणू काही दिल्ली येथील राजपथ अवतरल्याची अनुभूती थेरगाव करांनी यावेळी घेतली.

सकाळी 7.30 वाजता राष्ट्रगीतानंतर पथ संचालानाचा सोहळा सुरु झाला. हा सोहळा दहा वाजेपर्यंत चालला. संचलन सोहळा मार्गावर ठराविक अंतरावर साऊंड बसवण्यात आले होते. पथसंचलनाला एकाच वेळी ध्वजारोहण होणाऱ्या ठिकाणाहून वेळो वेळी सूचना आणि मार्गदर्शन केले जात होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)