थेरगावातील बहुउद्देशिय इमारतीला अखेर मुहुर्त

पिंपरी – प्राधिकरण आणि महापालिका प्रशासनाच्या मतभेदाचा फटका बसल्याने गेली कित्येक वर्षे सुविधांच्या बाबतीत दुर्लक्षित राहिलेल्या थेरगाव येथील नागरिकांना प्रशासकीय कामकाज एकाच ठिकाणी करणे सोपे व्हावे, यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने सर्वे नंबर 9 मधील आरक्षण क्रमांक 625 मधील बहुउद्देशीय प्रस्तावित प्रशासकीय इमारतीचे बांधकाम हाती घेतले आहे. पोलीस, अग्निशामक, आरोग्य, करसंकलन, ज्येष्ठ नागरिक, विद्युत, पाणी पुरवठा, वाचनालये आदी विभागांचे प्रशासकीय कामकाज एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे.

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने भूखंड आरक्षित केल्यानंतर थेरगाव येथील स्थानिक शेतकऱ्यांनी काडीमोल किंमत आकारून जमिनीचे प्लॉटींग करून विक्री केली. या फसवणुकीला बळी पडलेल्या भोळ्याभापड्या नागरिकांनी आरक्षित जागेवर स्वतःची घरे बांधली. प्राधिकरण प्रशासनानेही आरक्षित भूखंडावरील अतिक्रमण रोखण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे आज थेरगाव येथील आरक्षित भूखंडावर नागरिकांची घरे आहेत. ही घरे अनधिकृत असताना देखील महापालिका प्रशासनाने येथील नागरिकांना मोजक्‍या सोयी सुविधा दिल्या.

त्याबदल्यात कर वसूल केला. काही भूखंड पालिकेच्या हद्दीत येत नसल्यामुळे मिळकत कर वसूल करण्याचा अधिकार पालिका प्रशासनाला नाही. परंतु, इतर कर वसूल केले जातात. तथापि, कर वसुलीच्या बदल्यात मुबलक सुविधा दिल्या जात नाहीत. ड्रेनेज लाईन चोकअप, विस्कळीत पाणी पुरवठा, खंडीत विद्युत पुरवठा, पथदिव्यांची वानवा, अपुरे पदपथ, उद्यान, क्रीडांगण आदी समस्यांचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. संबंधित समस्या सोडविण्यासाठी महापालिकेतील अधिकाऱ्यांशी संपर्क साधणे कठीण होत असल्यामुळे सुजाण नागरिक सारथी हेल्पलाईनवर तक्रारी करत आहेत. मात्र, त्यांच्या तक्रारींची दखल घेतली नाही. अशी परिस्थिती असल्यामुळे नागरिक हैराण आहेत. नागरिकांना याचठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने बहुउद्देशीय इमारत बांधून त्यामध्ये विविध विभाग सुरू करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. त्यानुसार प्रत्यक्ष इमारतीच्या कामाचे आदेश दिले आहेत. लवकरच बहुउद्देशीय प्रशासकीय इमारत उभी राहणार असून नागरिकांना प्रशासकीय कामकाज करणे अत्यंत सोपे होणार आहे.

थेरगाव येथील सर्व्हे नंबर 9 मधील आरक्षण क्रमांक 625 मध्ये ही इमारत उभारण्यात येणार आहे. 7 हजार 41 चौरस मीटर एवढे इमारतीचे भूखंड क्षेत्रफळ आहे. त्यामध्ये 1112.33 चौरस मीटर क्षेत्रफळावर इमारतीचा जोता उभारण्यात येणार आहे. 1799.49 चौरस मीटर क्षेत्रफळावर सुसज्ज वाहनतळ असणार आहे. अशा एकूण 5590.86 चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड व्यापणार आहे. इमारत उभारण्यासाठी तब्बल 13 कोटी 26 लाख 82 हजार 336 एवढी रक्कम खर्च होणार आहे. या कामासाठी सावन जगदाळे ऍण्ड असोसिएट्‌स यांची वास्तुविशारद व सल्लागार म्हणून नेमणूक केली आहे. हे काम मे. एस. एस. साठे या ठेकेदार संस्थेला दिले आहे. काम पूर्ण करण्यासाठी 24 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. त्यासाठी 22 फेब्रुवारी 2018 रोजी कामाचे आदेश दिले आहेत.

…अशी आहे इमारत
बहुउद्देशिय प्रशासकीय इमारत तीन मजली असणार आहे. बेसमेंटला सुसज्ज वाहन तळ राहणार आहे. तळमजल्यावर पोलीस, आरोग्य, करसंकलन, ज्येष्ठ नागरिक व इतर विभाग कार्यरत राहणार आहेत. पहिल्या मजल्यावर अग्निशामक, विद्युत, माध्यम, आरोग्य व इतर विभागाचे कामकाज चालणार आहे. तर, दुसऱ्या मजल्यावर करसंकलन, पाणी पुरवठा व इतर विभागाचे कामकाज चालणार आहे. आणि तिसऱ्या मजल्यावर भव्य हॉल, वाचनालय, माध्यम, व्यायामशाळा आणि इतर विभाग कार्यरत राहणार आहेत. त्यामुळे संबंधित विभागांचे कामकाज करण्यासाठी नागरिकांना महापालिकेत हेलपाटे मारावे लागणार नाहीत. नागरिकांना त्यांच्या प्रभागातच कामकाज करण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे, अशी माहिती अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)