थर्माकोल, प्लॅस्टिक विक्रेते निशाण्यावर

बंदी असलेल्या साहित्य विक्रेत्यांवर होणार कारवाई

पुणे – थर्माकोल आणि प्लॅस्टिक पिशव्यांवरील बंदी न्यायालयाने कायम ठेवल्यानंतर देखील सध्या शहरामध्ये अनेक दुकानांमध्ये थर्माकोलच्या आरास, मंदिरे, मखर, प्लॅस्टिकचे हार, फुले, पाने आणि अन्य सजावटीच्या साहित्यांची सर्रास विक्री होताना दिसत आहे. मात्र यावर आता महापालिका कारवाई करणार असून, अशा वस्तूंची खरेदी नागरिकांनी करू नये, असे आवाहन महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्‍वर मोळक यांनी केले आहे.

प्लॅस्टिक आणि थर्माकोल दोन्ही घटक पर्यावरणासाठी घातक असून, यामुळे अनेक पर्यावरणीय समस्या निर्माण होत असल्याने राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाने प्लॅस्टिक आणि थर्माकॉलवर बंदी घातली. त्याविरोधात थर्माकोल बनविणारे काही व्यापारी उच्च न्यायालयात गेले होते. मात्र, न्यायालयाने प्लॅस्टिकबरोबरच थर्माकोलवरील बंदीही कायम ठेवली. त्यानंतर देखील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात थर्माकोल विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे.

वास्तविक, या बंदीबाबत संभ्रमावस्था असल्याने व्यापाऱ्यांनी बंदी असलेल्या गोष्टी विक्रीसाठी आणल्या आहेत. परंतु या वस्तूंवरील बंदी कायम असल्याने त्यावर कारवाई केली जाणार आहे, असे मोळक यांनी स्पष्ट केले.

गणेशोत्सव दहा दिवसांवर येऊन ठेपला असून, गणेशोत्सवात घरोघरी आरास केली जाते. यासाठी गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात थर्माकोलची रंगीत मंदिरे, मखर, समया, फुले आणि अनेक सजावटींच्या वस्तू यांचा वापर केला जातो. पुण्यातील होलसेल मार्केटमध्ये दर वर्षी गणेशोत्सवासाठी थर्माकोलच्या विविध वस्तू विक्रीसाठी ठेवल्या जातात. यंदा बंदीमुळे प्रमाण कमी झाले असले तरी अनेक दुकांनामध्ये आजही थर्माकोल विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहे.

याची विक्री करणाऱ्यांवर महापालिका कारवाई करणार असून, पाच हजार रुपये दंड केला जाणार आहे. या आठवड्यापासूनच या कारवाईला सुरूवात केली जाणार असल्याचे मोळक यांनी नमूद केले.

प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर मात्र सर्रास
प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात आली असतानाही बाजारात मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा या पिशव्यांच्या वापराला सुरूवात झाली आहे. व्यापाऱ्यांनीही त्यांचा दडवून ठेवलेला माल बाहेर काढला आहे. सिग्नलला, रस्तोरस्ती वस्तू विक्री करणाऱ्या लोकांकडेही गार्बेज बॅग्ज सारख्या वस्तू दिसून येत आहेत. खरेच कारवाई होईल या भितीने प्लॅस्टिकच्या पिशव्या नागरिकांनीही वापरणे सोडून दिले होते. मात्र आता कारवाईच होत नसल्याने नागरिकांनीही सर्रास याचा वापर सुरू केल्याचे दिसून येते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)