थर्टीफर्स्टला “दारू नको, दूध प्या’

“अंनिस’, “व्यसनमुक्ती’च्या उपक्रमाला प्रशासनाचेही पाठबळ

सातारा – नवीन वर्षाचे स्वागत व्यसनमुक्त पद्धतीने करताना “दारू नको, दूध प्या’ असे आवाहन करत या अभिनव उपक्रमासाठी सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी कैलास शिंदे यांनी परिपत्रकही जारी केले आहे. अंनिस आणि परिवर्तनच्या मोहिमेला पाठबळ देत जिल्हा परिषदेच्या पुढाकाराने हे एक महत्वाचे सुधारणावादी पाऊल सातारा जिल्ह्याने टाकले आहे, अशी माहिती महाराष्ट्र अंनिस राज्य सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर आणि राज्य प्रधान प्रशांत पोतदार यांनी दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, सातारा जिल्हा परिषदेच्या गट विकास अधिकारी, सरपंच तसेच ग्रामसेवक यांना काढलेल्या परिपत्रकात पर्यावरण रक्षणाबरोबरच व्यसनमुक्तीचा संदेश देत 31 डिसेंबरला ग्रामपंचायत पातळीवर दारू नको दूध प्या हा उपक्रम राबवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये 31 डिसेंबरला सेलिब्रेशनच्या नावाखाली खास करून तरुण पिढीमध्ये मोठ्या प्रमाणात व्यसनांचे प्रमाण वाढत आहे. बहुधा अनेक तरुण-तरुणी 31 डिसेंबरला व्यसनाचा पहिला अनुभव घेतात आणि पुढे जाऊन व्यसनाच्या आहारी जातात. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र अंनिस, विवेक वाहिनी आणि परिवर्तन डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या कल्पक नेतृत्वातून साकारलेली “चला व्यसन बदनाम करूया’ ही व्यसन विरोधी मोहीम गेली पाच वर्षे राबविली जात आहे.
या मोहिमे अंतर्गत तरुणांना व्यसनमुक्ती दूत म्हणून काम करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

व्यसनमुक्ती दूताचे प्रशिक्षण घेतलेले युवक युवती समाजात व्यसनाच्या विरोधी पोस्टर प्रदर्शन, व्यसन विरोधी फिल्म शाळा-कॉलेजमध्ये दाखवणे, गावामध्ये व्यसन विरोधी फेरीचे आयोजन करणे, शाळा कॉलेजमध्ये व्यासनाविषयी भाषण देणे, दारूच्या बाटलीला जोडे मारो आंदोलन, व्यसन विरोधी प्रतिज्ञा असलेल्या फ्लेक्‍सवर नागरिकांच्या सह्या घेणे, तसेच सोशल मीडियामध्ये व्यसन विरोधी संदेश प्रसारित करणे असे कार्यक्रम ठिकठिकाणी करणार आहेत, अशी देखील माहिती देण्यात आली.

31 डिसेंबरला लोकांनी दारू प्यावी म्हणून दारू दुकाने उशिरापर्यंत चालू ठेवण्याची परवानगी शासन देते हे व्यसनाला पाठिंबा देणारे धोरण शासनाने थांबवावे म्हणून जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदने देण्यात येणार आहेत.
31 डिसेंबर रोजी महाराष्ट्रात ठिकठिकाणी व्यसनमुक्त व्यक्ती आणि त्यांचे कुटुंबीय यांचा स्नेहमेळावे आयोजित करण्यात येणार आहे. नागठाणे, चिंचणेर वंदन, तसेच गोल बाग राजवाडा येथे मोफत दूध वाटपाचे कार्यक्रम घेण्यात आले आहेत. परिवर्तन संस्थे मार्फत किशोर काळोखे, उदय चव्हाण, रुपाली भोसले, योगिनी मगर हे या यशस्वीतेसाठी प्रयत्न करीत आहेत. नागरिकांनी या मोहिमेमध्ये सहभागी होऊन व्यसन विरोधी कार्यक्रमात पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा डॉ. हमीद दाभोळकर व प्रशांत पोतदार यांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)